३६ दिवसांनी विभाग मिळाले आता कार्यालयाची प्रतीक्षा

    पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने आयुक्त राजेश पाटील यांनी उपायुक्त आणि सहायक आयुक्तांच्या बदल्या केल्या. उपजिल्हाधिकारी संवर्गातील विठ्ठल जोशी यांना महापालिकेत रुजू झाल्यानंतर ३६ दिवसांनी दक्षता आणि गुणनियंत्रण (प्रशासकीय व तांत्रिक) विभागाचे प्रमुख केले. या महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी असताना कामकाजासाठी कार्यालयच उपलब्ध नसल्यामुळे त्यांची कोंडी झाली आहे. आयुक्त दालनातील दक्षता विभागाच्या कक्षात कार्यकारी अभियंत्याने कब्जा केल्याने जोशी यांना इतर विभागप्रमुखांच्या कार्यालयाचा आसरा घ्यावा लागत असल्याचे चित्र आहे.
    राज्य शासन सेवेतील उपजिल्हाधिकारी विठ्ठल जोशी आणि सचिन ढोले यांची पिंपरी – चिंचवड महापालिकेत उपायुक्त म्हणून १ एप्रिल २०२२ रोजी नियुक्ती करण्यात आली. आयुक्त राजेश पाटील यांनी त्यांच्याकडे कोणतेच कामकाज सोपविले नव्हते, तब्बल ३६  दिवस हे दोन्ही उपजिल्हाधिकारी कामाच्या प्रतिक्षेत ताटकळत राहिले. अखेरिस ६ मे रोजी आयुक्तांनी प्रशासकीय खांदेपालट केली. विठ्ठल जोशी यांच्याकडे दक्षता आणि गुणनियंत्रण (प्रशासकीय व तांत्रिक) विभाग, माहिती व तंत्रज्ञान विभाग, नागरी सुविधा केंद्र यांचा कार्यभार सोपविण्यात आला. तर, सचिन ढोले यांच्याकडे अतिक्रमण निर्मुलन विषयक कामकाज आणि पशुवैद्यकीय विभागाचा कार्यभार देण्यात आला.
    प्रशासकीय राजवटीमुळे लोकप्रतिनिधींची कुलुपबंद असलेली दालने बुधवारी  अधिका-यांसाठी खुली करण्यात आली. सभागृहनेत्यांचे कार्यालय अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उपमहापौरांचे कार्यालय सहआयुक्त आशादेवी दुरगुडे आणि विधी समिती सभापतींचे कार्यालय उपायुक्त सचिन ढोले यांना देण्यात आले. तथापि, प्रशासकीय कामाकाजासाठी कार्यालयच नसल्यामुळे उपायुक्त विठ्ठल जोशी यांची तारांबळ उडाली. महापालिका आयुक्त दालनात असलेल्या दक्षता आणि गुणनियंत्रण विभागाच्या कक्षात कार्यकारी अभियंता शिरीष पोरेडी यांचा ताबा आहे.