javhar doli

भाटीपाडा गावात राहणाऱ्या लक्ष्मी घाटाल वय वर्ष ६२ या वृद्ध महिलेच्या पायाला मोठी जखम झाल्याने त्यांचा पाय सुजला आहे. वेदना असह्य झाल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. रस्ता नसल्याने रुग्णाला नेण्यासाठी डोली बनवावी लागली.

    संदीप साळवे,जव्हार: भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (75 Years Of Independence) साजरा करत असताना जव्हार तालुक्यातील ग्रामीण भागात आदिवासींना आजही पायाभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. ही अतिशय खेदाची आणि दुःखद बाब आहे. तालुक्यातील पाथर्डी (Pathardi) ग्रामपंचायत हद्दीतील एका वृद्ध महिलेला रुग्णालयात नेताना रस्त्याअभावी लाकडी डोलीचा आधार घेऊन रुग्णालयात नेण्याची वेळ आली आहे.

    भाटीपाडा गावात राहणाऱ्या लक्ष्मी घाटाल वय वर्ष ६२ या वृद्ध महिलेच्या पायाला मोठी जखम झाल्याने त्यांचा पाय सुजला आहे. वेदना असह्य झाल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. रस्ता नसल्याने रुग्णाला नेण्यासाठी डोली बनवावी लागली. त्यानंतर काळशेती नदीच्या पात्रातून जवळपास १०० मीटर अंतर पार करून मुख्य रस्ता येईपर्यंत ३ किलोमीटर अंतर चालत डोंगर दऱ्या व जंगलातून वाट काढत वृद्ध महिलेला जव्हार रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही बाब बहुजन विकास आघाडीचे जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा यांना फोनद्वारे समजली. त्यांनी तात्काळ या रुग्णाला जव्हार येथे उपचार मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

    या गावात रस्ता व्हावा यासाठी गेल्या दोन वर्षांपासून दरोडा हे पाठपुरावा करत आहेत. मात्र अजूनही रस्ता बनविण्यासाठी निधी मिळाला नाही. ही जागा वन विभागात असल्याचे कारण देण्यात येत होते. मात्र आता वनविभागाच्या ३(२) चा प्रस्ताव मंजूर झाला असून केवळ निधी उपलब्ध झाल्यास हा रस्ता होऊ शकेल, असे बहुजन विकास आघाडीचे जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा यांनी सांगितले. यावेळी झाप ग्रामपंचायत माजी उप सरपंच तुकाराम गरेल, चंद्रकांत वाढू, जगन खानझोडे, लक्ष्मण खानझोडे, विलास बागुल व भाटीपाडा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.