मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य झाल्या असून, उपोषण सोडत असल्याचं जाहीर केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगे आपलं उपोषण सोडलं. त्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या मराठा आरक्षणाबाबत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोर्चा काढला होता. कुणबी नोंद सापडणाऱ्यांच्या सोयऱ्यांनाही सरसकट प्रमाणपत्र द्यावे आणि शपथपत्र घेऊन सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या अशा मागण्या घेऊन मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने आले होते. अखेर मध्यरात्री झालेल्या बैठकीनंतर मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य झाल्या असून, उपोषण सोडत असल्याचं जाहीर केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगे आपलं उपोषण सोडलं. त्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    भुजबळ नेमकं काय म्हणाले?

    राज्य सरकारने सध्या काढलेला जीआर ही एक प्रकारची नोटीस आहे. त्यावर हरकती मागवण्यात येणार आहे. येत्या १६ फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत. आता ओबीसी समाजातील वकिल व तज्ज्ञांनी लाखोंच्या संख्येने हरकती पाठवून द्याव्या. त्यामुळे सरकारला दुसरी बाजू लक्षात येईल. तसेच या प्रकरणाचा समता परिषदेच्या माध्यमातून आम्ही विचार करु. योग्य पद्धतीने कारवाई करु. सरकारने त्यानंतरही कायदा केला तर आम्ही न्यायालयात जाऊ, असा स्पष्ट इशारा छगन भुजबळ यांनी दिला.

    मोफत शिक्षण कशासाठी?

    सरसकट गुन्हे मागे घ्या ही मागणी मान्य झाली. त्याबद्दल छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केला. उद्या कोणी घरे जाळली तरी गुन्हे मागे घ्या, असे कसे चालणार आहे, असा सवाल त्यांनी आपल्याच सरकारला विचारला. मराठा समाजातील सर्व मुले आणि मुलींना शंभर टक्के शिक्षण मोफत देण्याचा निर्णय झाला. मग फक्त त्यांनाच मोफत शिक्षण का? सर्वांचे शिक्षण मोफत द्या. फक्त एकाच समाजाला मोफत शिक्षण कशासाठी? असा प्रश्न त्यांनी विचारला. आता सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी उद्या पाच वाजता सरकारी निवासस्थानी छगन भुजबळ यांनी बैठक बोलवली आहे. या बैठकीला सर्व पक्षांनी ओबीसीच्या छत्राखाली एकत्र या, असे आवाहन त्यांनी केले.