बांधकामावरून झालेल्या वादानंतर तिघांनी गॅरेजच पेटवलं; गाड्यांची तोडफोडही केली

सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरातील अंबाईदरा सिद्धी चौकात गॅरेजमध्ये लागलेल्या आगीचे कारण समोर आले असून, इमारतीच्या बांधकामावरून असलेल्या वादातून तिघांनी गॅरेजची तोडफोड करत आग लावण्यात आल्याचे समोर आले आहे.

    पुणे : सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरातील अंबाईदरा सिद्धी चौकात गॅरेजमध्ये लागलेल्या आगीचे कारण समोर आले असून, इमारतीच्या बांधकामावरून असलेल्या वादातून तिघांनी गॅरेजची तोडफोड करत आग लावण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणात तिघांवर गुन्हा नोंद करत एकाला अटक केली आहे.

    आगीत ४ चारचाकी, ६ दुचाकी अशी १० वाहने जळून खाक झाली आहेत. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात अशोक धिंडले (वय ३५) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, नितीन रणझुंजार, किरण खिलारे यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी किरण खिलारे याला अटक केली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धायरी येथील अंबामाता मंदिराजवळ परफेक्ट ॲटो गॅरेज व वॉशिंग सेंटर आहे. तक्रारदारांचे हे गॅरेज असून, जागा मालक व त्यांच्या भावामध्ये इमारतीच्या बांधकामावरून वाद आहेत. या वादातून तिघांनी बुधवारी रात्री येथे येऊन सुरक्षा रक्षक यांना धारधार हत्याराने मारण्याचा प्रयत्न केला. तसेच, शेडमध्ये लावलेल्या ६ दुचाकी व ४ चारचाकी वाहनांवर पेट्रोल टाकून आग लावली. तर, गॅरेजमध्ये लावण्यात आलेल्या इतर ६ वाहनांची तोडफोड करून ड्राव्हरमधील रोकड चोरून नेली.

    दरम्यान त्यानंतर हवेत हत्यारे फिरवून मी एक मर्डरकरून जेलमधून बाहेर आलो आहे, कोणी आवाज काढला तर समीर पोकळे सोबत तुमची पण गेम करेल असे म्हणत परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, आगीची घटना घडल्याने एकच धावपळ उडाली. नागरिकांनी याची माहिती अग्निशमन दलाला दिली. तेव्हा जवानांनी येथे धाव घेऊन पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली.