file photo
file photo

प्रतापगडावरील अफजल खानच्या कबर जवळ असलेलं अतिक्रमण हटवण्याची मोहीम गेल्या आठवडय़ापासून सुरू होती. ही मोहीम पूर्ण होताच प्रतापगड पर्यटकांसाठी खुला करण्यात आलं आहे.

    सातारा : गेल्या आठ दिवसापासून प्रतापगडवर सुरु असलेली अतिक्रमण हटवण्याची मोहीम पुर्ण झाली आहे. आता प्रतापगड (Pratapgad Fort) पर्यटकांसाठी शुक्रवारपासून खुला करण्यात आला आहे. अतिक्रमण सुरू असताना जमावबंदी लागू करण्यात आली होती. अखेर आठ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर प्रतापगडावरील पर्यटन सर्वासाठी खुले करण्यात आले आहे.

    प्रतापगडाच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आलं होतं. या अतिक्रमणामुळे प्रतापगडाच्या सौंदर्य खराब होत असल्याची तक्रार करण्यात येत होती. या पार्श्वभुमीवर गडाच्या पायथ्याशी असलेलं अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या आठ दिवसापासून अफजल खानच्या कबरी जवळील अतिक्रमण हटवण्याची मोहीम मागील आठवडय़ात सुरू करण्यात आली. यासाठी दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या काळात परिसरात जमावबंदी आदेश जारी करण्यात आला होता. पर्यटकच नाहीतर या भागात राहणाऱ्या नागरिकांनाही गडावर ये-जा करण्यास बंदी घालण्यात आली होती. या निर्णयामुळे स्थानिक नागरिक, व्यावसायिकांपासून ते र्पयटकांपर्यंत अनेकांची गैरसोय होत होती. पर्यटकांसोबतच गडावरील व्यावसायिकांनीही ही बंदी उठवण्याची मागणी केली होती. दरम्यान आता अफजल खान कबरीवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम नुकतीचं पूर्ण झाली असून शुक्रवारपासून (18 नोव्हेंबर) गडावरील बंदी आदेश मागे घेण्यात आला. यामुळे आजपासून गडावर पर्यटकांना प्रवेश देण्यात येऊ लागला. सातारा जिल्हा प्रशासनाच्या किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्याच्या निर्णयाचे स्थानिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    प्रतापगडावरील अतिक्रमण कारवाई

    प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाची कबर आहे. त्याच्या कबरी शेजारी उदात्तीकरण करण्यासाठी वनविभागाच्या हद्दीत अनेक खोल्यांचे अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.स्थानिकांनी तक्रारी करत हे अतिक्रमण काढावं यासाठी २००६ मध्ये आंदोलनही करण्यात आलं होतं. दरम्यान, प्रकरण न्यायालयात गेल्याने न्यायालयानेही हे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते.