अवघ्या पाच दिवसांनंतर लग्नसराई सुरू; तुळशी विवाहानंतर उडणार लग्नाचे बार…

अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या तुळशी विवाहानंतर लग्नसराईला सुरुवात होत आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरातील बहुतांशी मंगल कार्यालयांचे बुकींग झाले आहे. दिवाळीमध्ये दाग-दागिने, कपडेलत्ता व अनुषंगीक खरेदी सुरू होत आहे.

  पिंपरी : अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या तुळशी विवाहानंतर लग्नसराईला सुरुवात होत आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरातील बहुतांशी मंगल कार्यालयांचे बुकींग झाले आहे. दिवाळीमध्ये दाग-दागिने, कपडेलत्ता व अनुषंगीक खरेदी सुरू होत आहे. यंदाची दिवाळी जोरदार झाली असल्याने आता लग्नसराईच्या तयारीस बाजारपेठ लागली असून, दिवाळीनंतर पुन्हा एकदा विविध व्यवसायांना चालना मिळणार असल्याचे दिसून येत आहे.

  दिवाळी आली की लग्न सराईच्या तयारीला सुरूवात होते. लग्नाचा हॉल, बॅंडवाले, कॅटरींग आणि गरुजी यांच्या तारखा ठरवण्यासाठी घरच्या मोठ्यांची लगबग सुरू होते. घरात चैतन्याच वातावरण असतं. यंदाची दिवाळी अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळी नंतर तुळशीचे लग्न लावल्या जाते देवउठनी एकादशीला जगाचे पालनहर्ता योग निद्रेतून जागे होतात. त्यानंतर लग्न कार्याला सुरूवात होते.

  देवउठनी एकादशीचा दिवस खूप महत्वाचा आहे, या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांनी जागे होत असल्याने चातुर्मास संपतो. कार्तिक महिन्यातील शुक्‍ल पक्षातील एकादशी तिथीला देवउठनी एकादशी म्हणतात. यावर्षी देवउठनी एकादशी २३ नोव्हेंबरला आहे. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि उपवास केला जातो. यावर्षी श्रावण महिन्यात अधिक मास आल्याने श्रावण २ महिन्यांचा तर चातुर्मास ५ महिन्यांचा होता. त्यामुळे देवउठनी एकादशीसाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली.

  पंचांगानुसार, देवउठनी एकादशी तिथी २२ नोव्हेंबर असून, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:३१ वाजता समाप्त होईल. अशा स्थितीत २३ नोव्हेंबरला एकादशीचे व्रत केले जाणार आहे. या तारखेपासून सर्व शुभ कार्ये सुरू होतील. दुसऱ्याच दिवशी द्वादशी तिथीला भगवान विष्णू आणि तुळशीजींचा विवाह होतो. या दिवशी शालिग्राम रूप आणि तुळशीच्या रोपाचा विवाह केला जातो.

  या महिन्यात पाच मुहूर्त

  नोव्हेंबर महिन्यात २३ नोव्हेंबर, २४ नोव्हेंबर, २५ नोव्हेंबर, २७ नोव्हेंबर, २८ नोव्हेंबर आणि २९ नोव्हेंबर हे लग्नाचे मुहूर्त आहेत.