NCP MLA Prakash Shendge
NCP MLA Prakash Shendge

Maratha Reservation : मराठा आंदोलनानंतर आता दिवाळीनंतर OBC समाजाचे राज्यभर मोठे आंदोलन होणार आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र द्यायला ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली.

    मुंबई : मराठा आंदोलनानंतर आता OBC समाजाचे आंदोलन होणार आहे. मनोज जरांगे यांनी सरकारला 2 जानेवारी 2024 पर्यंत सरकारला मुदत दिल्यानंतर आता ओबीसी समाज रस्त्यावर उतरणार आहे. सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसीमध्ये घेऊ नये. त्यामुळे ओबीसी समाजावर फार मोठा अन्याय होणार आहे. ओबीसींच्या पावणेचारशे गरीब जमाती आहेत. आमच्या मुला-बाळांचे, लेकरांचे आरक्षण अशा प्रकारे कुणबी दाखले देऊन हडप करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात सुरू आहे. आम्ही ओबीसी नेते हे खपवून घेणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकश शेंडगे यांनी दिला.

    मंत्रिमंडळात राहून संघर्ष करा

    आम्ही भुजबळांना सांगितले आहे, तुम्ही मंत्रिमंडळात राहून संघर्ष करा. राजीनामा देऊन बाहेर पडू नका. आम्ही बाहेर राहून संघर्ष करू” असं प्रकाश शेंडगे म्हणाले. “हा संघर्ष आमच्या हक्काच्या आरक्षणाच संरक्षण करण्यासाठी आहे. सगळे ओबीसी भटके, विमुक्त रस्त्यावर उतरून लढा सुरू करणार आहोत. दिवाळी संपली की, राज्यभर आंदोलन सुरू करणार आहोत, असे प्रकाश शेंडगे यांनी सांगितले.

    महाराष्ट्र सरकारने शब्द दिला

    “ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, असा महाराष्ट्र सरकारने शब्द दिला होता. आधी सांगितले, निजामाच्या नोंदी शोधत आहोत. सुरुवातीला 5 हजार, 11 हजार नोंदी निघाल्या, आम्ही मान्य केल्या. आता शिंदे समितीला संपूर्ण महाराष्ट्रात नोंदी शोधण्याच काम लावले आहे.

    मागासवर्गीय ठरवायच षडयंत्र हाणून पाडणार

    मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन मागासवर्गीय ठरवायच हे षडयंत्र हाणून पाडणार, असे प्रकाश शेंडगे म्हणाले. “सुप्रीम कोर्टाने मराठा समाज मागस नाही हे दाखवून दिले आहे. आता कुणबी दाखले देऊन मागासवर्गीय होतो का?. जात बदलण्याचा अधिकार कोणाला नाहीये. आम्ही न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णयसुद्धा केला आहे. अशा प्रकारे कुठली समिती नेमून मागासवर्गीय ठरवू शकत नाही. एखाद्या समाजाला मागास ठरवण्याची प्रक्रिया असते. राज्य मागासवर्गीय आयोग आहे, असे प्रकाश शेंडगे यांनी सांगितले.

    ‘ओबीसी रस्त्यावर येऊ शकत नाही असे समजू नये’
    “आम्ही ओबीसींनी आवाहन करतोय. आम्हाला आमच्या हक्काच रक्षण करण्यासाठी रस्त्यावर याव लागेल. दिवाळीनंतर 17 तारखेला अंबडला, त्यानंतर 26 नोव्हेंबरला हिंगोलीला दुसरा मेळावा होईल” असं प्रकाश शेंडगे म्हणाले. “आम्ही आमची संख्या दाखवून देऊ. ओबीसी रस्त्यावर येऊ शकत नाही असं समजू नये. मरणाची लढाई लढण्याची पाळी आली तरी चालेल. गरीब, ओबीसी समाजाचा आरक्षणचा संरक्षण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आम्ही मतपेटीतून आमची ताकद दाखवून देऊ. ओबीसी समाज शांत बसणार नाही. ओबीसी समाज ठामपणे भुजबळांच्या पाठिशी आहे” असं प्रकाश शेंडगे म्हणाले.