नागपूरकरांनो काळजी घ्या; पुणे, मुंबईनंतर आता नागपूर शहराचीही हवा होतीये प्रदूषित

हिवाळ्याच्या दिवसात (Winter Season) देशाची राजधानी नवी दिल्लीतील वायू प्रदूषण कायम चर्चेत असते. मात्र, देशातील अनेक शहरांमधली परिस्थिती याहून वेगळी नाही. राज्याच्या उपराजधानीचे शहर असलेले नागपूर देखील त्याला अपवाद नाही.

    नागपूर : हिवाळ्याच्या दिवसात (Winter Season) देशाची राजधानी नवी दिल्लीतील वायू प्रदूषण कायम चर्चेत असते. मात्र, देशातील अनेक शहरांमधली परिस्थिती याहून वेगळी नाही. राज्याच्या उपराजधानीचे शहर असलेले नागपूर देखील त्याला अपवाद नाही. दिवाळीपूर्वीच शहरातील हवा बदलू लागली आहे. वाहनांमधून निघणाऱ्या धुरासह कचरा जाळणे, बांधकामांमुळे वायू प्रदूषण वाढत आहे.

    ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक वाढला आहे. दिवाळीपासून जवळपास आठवडाभर वायू प्रदूषण शिगेला राहील, असा अंदाज आहे. केंद्रीय पर्यावरण प्रदूषण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, हवेचा दर्जा निर्देशांक 200 ओलांडल्यास शहरातील हवा खराब होईल. हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी शहरात 4 ठिकाणी स्थानके निर्माण करण्यात आली आहेत. यापैकी 3 स्थानके राष्ट्रीय वायु गुणवत्ता देखरेख कार्यक्रमांतर्गत तर एक स्थानक राज्य वायु गुणवत्ता कार्यक्रमांतर्गत चालविले जाते.

    चार स्थानकांमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स, सदर पॉलिटेक्निक, उद्योग भवन, व्हीएनआयटी यांचा समावेश आहे. चारही स्थानके गर्दीच्या ठिकाणी नाहीत. दुसऱ्या बाजूला शहरात वाहतूककोंडीसारखी समस्या वाढत आहे. सर्वाधिक वायू प्रदूषण हे अंतर्गत भागात होते. गेल्या काही दिवसांत उद्योग भवन स्थानकावरील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 75 ते 115 पर्यंत पोहोचला आहे. तरीही परिस्थिती मध्यम असली तरी ती बिघडायला जास्त वेळ लागणार नाही.

    थंडीचा प्रभाव वाढला

    सणासुदीच्या काळात रस्त्यावर वाहनांची संख्या वाढली आहे. बाजारपेठांमध्ये गर्दी वाढल्याने वायू प्रदूषणातही वाढ झाली आहे. दुसरीकडे थंडीचा प्रभाव वाढला आहे. थंडीच्या दिवसात पृष्ठभागावरील आर्द्रतेमुळे धूलिकण आणि हवेतील इतर कण खाली गोठलेले राहतात. त्यामुळे श्वसनाशी संबंधित आजार होण्याची शक्यताही वाढते.