देर आये दुरुस्त आये! राज्यपालांच्या पदमुक्त होण्याच्या इच्छेनंतर विरोधक म्हणाले…

मिटकरी म्हणाले की, “ज्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत उद्घाटनासाठी आले होते, त्यादिवशी राज्यपालांची देहबोली वेगळ्या पद्धतीची जाणवली होती. राज्यपालांनी कधीच महाराष्ट्र सोडून जायला हवे होते. पण यानिमित्ताने ते आता जात असतील तर महाराष्ट्र सुटकेचा निःश्वास सोडेल.

  मुंबई – महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल जबाबदारीतून मुक्त व्हायचे आहे आणि तशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बोलून दाखवली असल्याचे एक निवेदन राज्यपालांच्यावतीने माध्यमांना पाठविण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत उदघाटनाच्या (१९ जानेवारी) कार्यक्रमाला आले असताना त्यांच्याजवळ जबाबदारीतून मूक्त करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे निवेदनात म्हटले आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अरविंद सावंत, नाना पटोले, अमोल मिटकरी यांनी राज्यपालांवर घणाघाती टीका केली आहे.

  हे उशीरा सुचलेले शहाणपण
  देर आये दुरुस्त आये! राज्यपालांनी घटनाबाह्य ज्या गोष्टी केल्या आहेत, त्याचं पापक्षालन राजीनाम्याने होणारं नाही. मात्र, हे उशीरा सुचले शहाणपण आहे, अशी प्रतिक्रिया अरविंद सावंत यांनी दिली. राज्यपालांनी अनेक घटनाबाह्य गोष्टी केल्या आहेत. त्यांनी ज्या मुख्यमंत्र्यांना शपथ दिली, ती कोणाच्या शिफारसीवरून दिली. हे आजपर्यंत महाराष्ट्राला कळलेलं नाही, असेही ते म्हणाले. मुळात अशा परिस्थिती सर्वाधिक संख्या असेल्या पक्षाला सत्तास्थापन करण्यासाठी बोलावलं जातं. त्यानंतर राजकीय पक्ष बैठक घेऊन नेता निवडतात. मात्र, अशी कोणतीही बैठक झाली, असा कोणताही नेता निवडला गेला नाही. तरी त्यांना कोणी सांगितलं की एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ द्यायची आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

  राज्यपाल भवन भाजपा भवन झालं
  नाना पटोले यांनी म्हटले की, “काँग्रेसने अनेकदा राज्यपालांबद्दलची भूमिका स्पष्ट केलेली आहे. संविधानिक व्यवस्थेच्या एका राज्याचे आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर ते बसलेले होते. परंतु सातत्याने संविधानिक व्यवस्थेचाही अपमान करणं, या राज्याच्या महापुरुषांचा अवमान करणं, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सातत्याने अवमानात्मक बोलणं, अशा व्यवस्थेच्या राज्यपालांना तातडीने हटवावे. राज्यपाल भवन भाजपा भवन झालं, अशा पद्धतीच्या आम्ही भूमिका मांडल्या आहेत. राष्ट्रपतींकडे आम्ही लेखी तक्रारी केल्या आहेत.” एबीपी माझाशी ते बोलत होते.

  राज्यपालांनी कधीच महाराष्ट्र सोडून जायला हवे होते. पण…
  मिटकरी म्हणाले की, “ज्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत उद्घाटनासाठी आले होते, त्यादिवशी राज्यपालांची देहबोली वेगळ्या पद्धतीची जाणवली होती. राज्यपालांनी कधीच महाराष्ट्र सोडून जायला हवे होते. पण यानिमित्ताने ते आता जात असतील तर महाराष्ट्र सुटकेचा निःश्वास सोडेल. दुसरं असं की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर जर सरकार कोसळले तर त्याअगोदरच आपण काढता पाय घ्यावा, अशी भावना त्यांच्या मनात जागृत झाली असेल. आज स्व. बाळासाहेब ठाकरे, नेताजी सुभाषचंद्र बोस, शहाजी राजे यांच्या जयंतीनिमित्त मी साकडे घालतो की, त्यांना लवकर सदबुद्धी मिळो आणि लवकर महाराष्ट्र सोडून त्यांनी राज्याला मोकळं करावं.