मराठा समाजानंतर आता धनगर समाज आक्रमक ! आरक्षणासाठी राधाकृष्ण विखे यांच्या अंगावरच उधळला भंडारा; कारवाई न करण्याचे विखे यांचे निर्देश

भंडारा हा नेहमीच पवित्र मानला जातो. पवित्र भंडाऱ्याची उधळण माझ्यावर झाली याचा मला विशेष आनंद आहे. अचाकनपणे ती कृती केल्यामुळे सुरक्षा रक्षकांनी विरोध करत प्रतिसाद दिला.

  सोलापूर : राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन तीव्र झाले असतानाच धनगर समाज देखील आरक्षणासाठी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात सोलापूर दोऱ्यावर असलेले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याची चर्चा करण्यासाठी गेलेल्या आंदोलकांनी थेट त्यांच्या अंगावरच भंडारा उधाळला आहे.

  सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज सोलापूर दौऱ्यावर आले होते. या दरम्यान धनगर समाजाच्या आंदोलकांनी त्यांची वेळ मागत त्यांना भेटण्याची विनंती केली. पोलिसांच्या मार्फतच राधाकृष्ण विखे पाटील यांनी या आंदोलकांना भेटण्याची तयारी दाखवली. आंदोलक आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात चर्चा सुरू असतानाच एका आंदोलकाने विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळला. त्यामुळे जवळील सुरक्षा रक्षकांनी त्या आंदोलकाला चांगलेच बदडले.

  अचानक झालेल्या कृतीने सर्वच गोंधळले

  धनगर समाजाचे कार्यकर्ते विखे पाटील यांना भेटण्यासाठी शांततेत विश्रामगृहामध्ये आले होते. त्यांच्याशी बोलण्यासाठी विखे पाटील उठून उभे राहिले आणि त्यांच्या मागण्यांची चौकशी केली. त्यावेळी धनगर समाजाचे आंदोलक शेखर बंगाळे यांनी विखे पाटील यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले. ते निवेदन वाचत असतानाच शेखर बंगाळे याने विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळला. त्यामुळे विखे पाटील यांच्यासह येथे उपस्थित सर्वच गोंधळले होते.

  भाजपच्या कार्यकर्त्यांनी लाथा बुक्क्याने तुडवले

  हा प्रकार घडताच तिथेच असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी बंगाळे यांना जोरदार मारहाण सुरू केली. बंगाळे यांना खाली पाडून त्याला लाथाबुक्क्यांनी तुडवण्यात आले. त्यावेळी शेखर बंगाळे आणि त्याचे समर्थक येळकोट येळकोट जय मल्हारा आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे, अशा घोषणा दिल्या. यावेळी विखे पाटील यांनीच त्याला सोडवण्यासाठी निर्देश दिले.

  पवित्र भंडाऱ्याची उधळण माझ्यावर झाली

  भंडारा हा नेहमीच पवित्र मानला जातो. पवित्र भंडाऱ्याची उधळण माझ्यावर झाली याचा मला विशेष आनंद आहे. अचाकनपणे ती कृती केल्यामुळे सुरक्षा रक्षकांनी विरोध करत प्रतिसाद दिला. त्यांची ती जबाबदारीच असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. तरी मी सूचना दिल्या आहेत की गुन्हा वगैरे दाखल करू नका. कोणतीही कारवाई न करण्याच्या निर्देश राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत.