नागपुरात झालेल्या पावसानंतर आता बळावताहेत आजार; डेंग्यूने 14 वर्षीय मुलीचा मृत्यू

दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसानंतर निर्माण झालेल्या पूरस्थितीतून शहर सावरत नाही, तोच पूरग्रस्त भागांत साथीच्या आजाराचे सावट घोंघावत आहे. असे असताना डेंग्यूचा (Dengue) संसर्गही वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

    नागपूर : दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसानंतर निर्माण झालेल्या पूरस्थितीतून शहर सावरत नाही, तोच पूरग्रस्त भागांत साथीच्या आजाराचे सावट घोंघावत आहे. असे असताना डेंग्यूचा (Dengue) संसर्गही वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या सर्व परिस्थितीवरून अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे चव्हाट्यावर आले आहे. रात्री डेंग्यूमुळे एका 14 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

    उत्तर नागपूरातल्या जुने ठवरे कॉलनी येथे राहणारी 14 वर्षीय शराया सुनील जांभूळकर ही शुक्रवारी रात्री अचानक आजारी पडली. कुटुंबीयांनी तिला जवळच्या दवाखान्यात नेले. शरायाला सलाईन लावण्यात आली. पण, काही वेळाने तिची प्रकृती खूपच बिघडली. तिला उलट्या होऊ लागल्या. दवाखान्यातील डॉक्टरांनी शरायाला मोठ्या रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला.

    दरम्यान, रात्री साडेदहा वाजता शरायाला बर्डी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पॅथॉलॉजीच्या अहवालात शराया डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. जांभूळकर कुटुंबीयांचे नातेवाईक निरंजन गजभिये यांनी ही माहिती दिली.