रायगडावरील शिवसन्मान आंदोलनानंतर पुढील दिशा ठरवणार : उदयनराजे भोसले

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केवळ माफी मागून चालणार नाही, तर त्यांनी पदाचा राजीनामा दिलाच पाहिजे, एखादा निर्लज्ज व्यक्तीच त्या पदावर राहू शकतो. असा तीव्र घणाघात खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केला.

  सातारा : खासदार उदयनराजे भोसले हे रडणारे नाही तर लढणारे व्यक्तिमत्व आहे. राज्यातील आणि केंद्रातील राज्यकर्त्यांना मी वेळ दिला आहे. ३ डिसेंबर रोजी रायगडावर होणाऱ्या आंदोलनानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केवळ माफी मागून चालणार नाही, तर त्यांनी पदाचा राजीनामा दिलाच पाहिजे, एखादा निर्लज्ज व्यक्तीच त्या पदावर राहू शकतो. असा तीव्र घणाघात खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केला.

  तारीख आणि तिथीचा वाद निर्माण करून आजपर्यंत वेगवेगळ्या तारखांना जयंत्या साजऱ्या करण्यात आल्या ही छत्रपतींची अवहेलना नाही. इतिहास तज्ञांची बैठक बोलावून हा वादच मिटवून टाका असे रोखठोक आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे प्रचंड राजकीय पडसाद महाराष्ट्रात उमटत असून या विरोधात खासदार उदयनराजे भोसले पुरते आक्रमक झाले आहेत. यापुढे छत्रपतींचा अपमान होणार नाही यासाठी उदयनराजे यांनी धोरणात्मक पावले टाकायला सुरुवात केली आहे. यासाठी ३ डिसेंबर रोजी रायगड येथे त्यांनी निर्धार शिव सन्मानाचा हे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

  ते पुढे म्हणाले, राज्यपालांनी इतकी मोठी घोडचूक केली आहे. त्या पदावर एखादा निर्लज्ज राहू शकतो. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी पत्र लिहिले आहे. ३ डिसेंबरला रायगडावर होणाऱ्या निर्धार आंदोलनानंतर मी माझी पुढील भूमिका स्पष्ट करणार आहे. भाजपच्या वरिष्ठ कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर राज्यपालांचा राजीनामा घेतला जावा, अशी भूमिका मी मांडणार आहे. त्यावेळी ते काय निर्णय घेतात ते बघून त्यापुढे मी माझी भूमिका स्पष्ट करेल, असा थेट इशारा उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.

  मी रडणारा नाही तर लढणार

  छत्रपती शिवरायांच्या सर्वधर्मसमभावाच्या भूमिकेमुळे देशाचे सार्वभौमत्व टिकून आहे. जर त्या विचारांशी फारकत घेतली तर देशाची फाळणी व्हायला वेळ लागणार नाही. भारतातील कोणताही राष्ट्रीय अथवा प्रादेशिक पक्ष असो त्यांच्या विचारांचा पाया छत्रपती शिवरायांचे ध्येय धोरणच आहे. असे असताना केवळ राजकारणासाठीच छत्रपतींच्या नावाचा वापर करायचा आणि सोयीस्कररित्या त्यांच्याविषयी भलती सलती विधाने करायची हे योग्य नाही. या संदर्भात मी माझी भूमिका मांडतो आहे, पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मी भावना वश झालो होतो, मी रडलो नाही पण मनाला वेदना होत होत्या, मी रडणारा नाही तर लढणारा आहे. हा बाणेदारपणा मला माझ्या छत्रपतींच्या संस्कारातूनच आला आहे. जर त्यांचा अपमान होत असताना मी गप्प बसलो तर मला राजे नाव लावायचा अधिकार नाही. त्यासाठीच येत्या ३ डिसेंबर रोजी निर्धार शिव सन्मानाचा या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे याकरिता आवाहन उदयनराजेंनी यावेळी केले.

  माझ्यावर कारवाई करणारा अजून जन्माला यायचाय

  इतिहासकारांनी आणि राज्यकर्त्यांनी एकत्र येऊन छत्रपती शिवरायांच्या जयंतीचा आणि शिवप्रताप दिनाच्या तारखांचा आणि तिथीचा हा घोळच मिटवून टाकावा, ही त्यांच्या विचारांची अवहेलना नाही काय असा रोखठोक सवाल त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. भाजपचे वरिष्ठ आपल्यावर कारवाई करतील याची आपणाला भीती वाटत नाही का? यावर बोलताना ते म्हणाले, माझ्यावर कारवाई करणारा अजून जन्माला यायचा आहे, मी कोणालाही घाबरत नाही आणि शिवप्रेरणेने भरलेल्या विचारांशी मी कधीही फारकत घेत नाही. कोल्हापूरच्या छत्रपतींनी तसेच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्यांच्या पद्धतीने आपली भूमिका मांडली आहे. मी माझ्या पद्धतीने माझी भूमिका मांडत असून प्रत्येकाचा लढण्याचा मार्ग वेगळा आहे. पण छत्रपतींच्या विचारांचा अपमान होऊ नये हीच आमची स्पष्ट भूमिका आहे. शिवप्रताप दिन सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मला कोणताही फोन केला नाही. मी काही कामानिमित्त बाहेर होतो. सकाळी आल्यानंतर शिवप्रताप दिन सोहळ्याची पत्रिका मला मिळाली तसेच झाल्याप्रकरणा संदर्भातही मला कोणाचा फोन आला नाही.

  शिव विचारांचा आदर व्हावा

  आपण राजकीय पडसादावर खासदारकीचा राजीनामा का देत नाही या प्रश्नावर उदयनराजे थेटपणे म्हणाले, राजीनामा देण्याचा काय संबंध माझी भूमिका शिव विचारांचा आदर व्हावा हीच आहे. त्यासाठी राजीनामा द्यायला पाहिजे असे काही नाही. थेट दिल्लीत जाऊन वरिष्ठांशी या संदर्भात चर्चा करून संबंधित व्यक्तींना राजीनामा देण्यास भाग पाडू. या प्रयत्नात आम्ही कोठेही कमी पडणार नाही. रायगड येथे छत्रपती शिवरायांच्या समाधी जवळ आम्ही आमची पुढील भूमिका स्पष्ट करू असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी प्रतापगड प्राधिकरण स्थापन करून जे २०० कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे, त्या विकास कामांसाठी मुख्यमंत्र्यांनी निधी द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.