Uddhav Thackeray

Uddhav Thackeray Mumbra Shivsena Visit : उद्धव ठाकरे यांनी आज मुंब्र्यातील शिवसेनेच्या शाखेला भेट दिली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यावेळी शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांसमोर आलेले पाहायला मिळाले. ठाकरे गट आणि सिंदे गटाची जोरदार धुमश्चक्री येथे पाहायला मिळाले.

  ठाणे : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मुंब्र्यातील शाखेच्या (Mumbra Shivsena Shakha) भेटीवेळी शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये राडा झाल्याचं दिसून येतंय. दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून त्यामुळे एकच गोंधळ झाल्याचं दिसून येतंय. पोलिसांनी ठाकरे गटाचा ताफा अडवल्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड भडकल्याचं दिसून आलं.
  शिवसेनेच्या शाखेला उद्धव ठाकरेंनी आज भेट
  शिवसेना शिंदे गटाने जमीनदोस्त केलेल्या मुंब्र्यातील शिवसेनेच्या शाखेला उद्धव ठाकरेंनी आज भेट दिली. त्यावेळी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंचे जोरदार स्वागत करण्यात आलं. त्याचवेळी थोड्याच अंतरावर असलेल्या एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्त्यांनीही त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्याचवेळी हा राडा झाल्याचं दिसून आलं.
  शिवसेनेची मध्यवर्ती शाखा शिंदे गटाने ताब्यात घेतली
  ठाकरे गटाची मुंब्र्यातील शिवसेनेची मध्यवर्ती शाखा शिंदे गटाने ताब्यात घेतली आणि नंतर ती जमीनदोस्त करण्यात आली. त्यानंतर या शाखेला उद्धव ठाकरे यांनी भेट द्यायचं ठरवलं. मुंब्र्यातील ही शाखा 1995 साली बांधण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांचे ठाणे आणि परिसरात जोरदार स्वागत करण्यात आलं. उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी फुलांनी भरलेले जेसीबी आणण्यात आले. उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ आजूबाजूच्या परिसरातून शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
  मुंब्र्यातील शाखेचा नेमका वाद काय?
  मुंब्रा इथं शिवसेनेची शाखा होती. राज्यातील सत्तांतर आणि शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट अशा दोन गटात शिवसेना विभागली. त्यानंतर शाखा-शाखांवर दोन्ही गटांकडून दावा केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंब्र्यातील शाखेवर दोन्ही गटांनी दावा केला. 2 नोव्हेंबरला मुंब्य्रातील ठाकरे गटाच्या शाखेवर शिंदे गटाने ताबा मिळवत बुलडोझर फिरवल्याचा आरोप आहे.
  शिंदे गटाने त्याच ठिकाणी कंटेनर शाखा बसवली
  आधीची शाखा जमीनदोस्त केल्यानंतर शिंदे गटाने त्याच ठिकाणी कंटेनर शाखा बसवली आहे. ही शाखा तात्पुरती असल्याचे सांगण्यात आले. मुंब्र्यातील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेतील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना बाहेर काढत शिंदे गटाने ही शाखा जेसीबीने जमीनदोस्त केल्याने गोंधळ उडाला होता.
  मुंब्य्रातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आणि सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कट्टर समर्थक असणारे राजन किणे (Rajan Kine) यांच्या नेतृत्वाखाली 40 ते 50 जणांच्या जमावाने शाखेत घुसून शिवसेना ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखाला बाहेर काढल्याचा आरोप आहे. त्यानंतर शाखेवरील बोर्डही काढला आणि शिंदे गटाचा बोर्ड लावून शाखेत प्रवेश मिळवत कब्जा केल्याचा आरोप आहे.
  शिंदे गटाचे कार्यकर्ते शाखेसमोर
  दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना विरोध करण्यासाठी शिंदे गटाच्या नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. शाखा ताब्यात घेण्यासाठी स्वतः पक्षप्रमुख येत आहेत, त्यांचे कार्यकर्ते कोणीच राहिले नाहीत हे दुर्दैवी आहे असं नरेश मस्के यांनी म्हटलं.
  ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना कल्याण स्टेशनवरूनच घेतलं ताब्यात
  उद्धव ठाकरे यांच्या समर्थनासाठी कल्याणवरून मुंब्र्याला निघालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांना कल्याण महात्मा पोलिसांनी स्टेशनवरूनच ताब्यात घेतलं. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातून रेल्वेचा प्रवास करत मुंब्र्यात जाण्यापूर्वी  कल्याण स्टेशन परिसरातून महात्मा फुले पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलीस व्हॅनमध्ये टाकून महात्मा फुले पोलीस ठाण्यात नेण्यात आले. कल्याण पूर्वेतील शिवसैनिकांना कोळशेवाडी पोलिसांनी नोटीसा धाडून प्रतिबंधक कारवाई करत पोलिसांनी मुंब्र्याकडे जाण्यास कार्यकर्त्यांना रोखले.