वेदांतानंतर आता ‘फोन पे’ कर्नाटकमध्ये हलवण्याची तयारी, याला जबाबदार शिंदे-फडणवीस सरकार – भाई जगताप

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असूनसुद्धा दर आठवड्याला दिल्लीवारी करून मोदी-शहांच्या (modi shah) इशाऱ्यावर सरकार चालवणे. यामध्येच शिंदे-फडणवीस सरकार (Shinde fadnvis government) मग्न आहे, येणारे प्रकल्प इतर राज्यामध्ये जाण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारच सर्वस्वी जबाबदार आहे, असा गंभीर आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केला.

    मुंबई : वेदांता (Vedanta) फॉक्सकॉनसारखा महाराष्ट्रात येणारा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर आता बल्क ड्रग पार्क (bullk darg park) हा महाराष्ट्रात येणारा प्रकल्प देखील कर्नाटकमध्ये (Karnataka) हलवण्यात आला आहे. तसेच भारतातील नामांकित कंपनी फोनपे ने सुद्धा आपले मुंबईतील मुख्यालय कर्नाटकमध्ये हलवण्याची तयारी सुरु केली आहे. हे सर्व प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यामागे या एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारचा नाकर्तेपणा आहे. राज्यासाठी विधायक व जनतेच्या हिताची कामे करण्याऐवजी उत्सव साजरे करणे, बंडखोर आमदारांच्या विभागात सभा व बैठका घेणे, इतर पक्षातील लोक शिंदे गटात सामील करणे, दिल्लीवाऱ्या (Delhi) करणे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असूनसुद्धा दर आठवड्याला दिल्लीवारी करून मोदी-शहांच्या (modi shah) इशाऱ्यावर सरकार चालवणे. यामध्येच शिंदे-फडणवीस सरकार (Shinde fadnvis government) मग्न आहे, येणारे प्रकल्प इतर राज्यामध्ये जाण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारच सर्वस्वी जबाबदार आहे, असा गंभीर आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केला.

    दरम्यान, बल्क ड्रग पार्क या प्रकल्पासाठी महाविकास आघाडी मंत्रिमंडळाने रायगड जिल्ह्यात अडीच हजार कोटींची जागाही दिली होती. तसेच हा प्रकल्प जर महाराष्ट्रात आला असता तर, जवळपास ८० हजार ते १ लाख युवकांना रोजगार मिळाला असता. आपल्या महाराष्ट्रात शेकडो फार्मसी कॉलेजेस आहेत. तसेच ज्या काही नामांकित औषध निर्मिती कंपन्या आहेत, त्या सर्वाधिक महाराष्ट्रात आहेत. असे असताना शिंदे- फडणवीस सरकारला हा प्रकल्प महाराष्ट्रात आणता आला नाही, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. हे कमी होते की काय म्हणून आता फोन पे (phone pe) या देशातील नामांकित कंपनीने देखील आपले मुंबईतील मुख्यालय कर्नाटकमध्ये हलविण्याची तयारी सुरु केली आहे. हे सर्व या शिंदे-फडणवीस सरकारच्या नाकर्तेपणामुळेच झाले आहे. त्यासाठी त्यांचा निषेध करावा तितका थोडाच आहे.

    जी गोष्ट या प्रकल्पांबाबत तीच वर्सोवा-वांद्रे सी लिंकबाबत घडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागील ७ वर्षांपासून नगरविकास खाते आहे. या प्रकल्पाच्या कामांसाठी विविध पदांच्या भरतीच्या मुलाखतीचे आयोजन चेन्नईमध्ये करण्यात आले आहे. प्रकल्प महाराष्ट्राचा आणि मुलाखती चेन्नईमध्ये. हा काय प्रकार आहे? महाराष्ट्रातील मुलांनी मुलाखत द्यायला चेन्नईमध्ये जायचे का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगरविकास खाते घेऊन काय करत आहेत, असा सवाल देखील भाई जगताप यांनी उपस्थित केला.