‘गदर-२’ बघून थिएटर बाहेर पडला, तेवढ्यात आठ-दहा जण आले अन्…

किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर तरुणावर हल्ला करणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराची टोळक्याने मंगला टॉकीज परिसरात भररस्त्यात मध्यरात्री कोयते व तलवाडीने सपासप वार करून निर्घुन हत्या केल्याची घटना घडली.

    पुणे : किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर तरुणावर हल्ला करणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराची टोळक्याने मंगला टॉकीज परिसरात भररस्त्यात मध्यरात्री कोयते व तलवाडीने सपासप वार करून निर्घुन हत्या केल्याची घटना घडली. दरम्यान, हा खूनाच्या प्रयत्नाचा रिप्लाय असल्याची चर्चा पोलीस दल व गुन्हेगारी क्षेत्रात आहे.

    नितीन मोहन म्हस्के (वय २६, रा. ताडीवाला रोड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सागर कोळानट्टी उर्फ यल्ल्या (वय ३२), मलिक कोळ्या उर्फ तुंड्या इम्रान शेख, पंडित कांबळे, विवेक नवघर, लॉरेन्स पिल्ले, सुशील सुर्यवंशी, बाबा आवळे, आकाश गायकवाड उर्फ चड्डी) (सर्व. रा. ताडीवाला रोड) यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सतीश आनंदा वानखेडे (वय ३४, ताडीवाला रोड) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

    कोरेगांव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन म्हस्के तसेच सागर उर्फ यल्ल्या यांच्यात अनेक दिवसांपासून वाद आहेत. ते वर्चस्व वादातून वाद असल्याची माहिती आहे. दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्या टोळ्याही आहेत. दरम्यान, काही दिवसांपुर्वी कोरेगांव पार्क परिसरात नितीन म्हस्केने सागर उर्फ यल्ल्या व साथीदारांवर खूनी हल्ला केला होता. याप्रकरणात कोरेगांव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. त्यावरूनच त्यांच्यात धुसफूस वाढली गेली होती. तर, या आरोपींनी खूनाच्या प्रयत्नाचा रिप्लाय खूनानेचं दिला, अशीही चर्चा सुरु आहे.

    दहा ते बारा जणांच्या टोळक्याने केला हल्ला

    दरम्यान, नितीन मंगळवारी (१५ ऑगस्ट) रात्री त्याच्या काही मित्रांसोबत मंगला टॉकीजला चित्रपट पाहण्यास गेला होता. याची माहिती आरोपींना भेटली. तेव्हा, आरोपींनी चित्रपट सुटण्याच्या वेळेलाच टॉकीज बाहेर दबा धरला. दहा ते बारा जणांच्या टोळक्याने नितीनला पाहताच भररस्त्यात त्याच्यावर तलवार, कोयते आणि काठीने त्याच्यावर सपासप वार करून त्याची निर्घुन हत्या केली. रस्त्यातच हा थरार घडला. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर देखील आरोपींनी त्याच्या डोक्यात वार केल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर टोळके भररस्त्याने पळून जाताना दिसून आले. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर तसेच गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलीस करत आहेत.