‘…हीच गोष्ट पंतप्रधान मोदींना आवडणार नाही’; आमदार रोहित पवार भडकले

सभेसाठी भाजपने जय्यत तयारी केली असून एसटी महामंडळाच्या 150  बस सभेसाठी वळवण्यात आल्या आहेत. मात्र यामुळे नागरिकांना त्रास होत असून याबाबत आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

    यवतमाळ – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. यवतमाळ येथील भारी मैदानावर भव्य सभा पार पडणार आहे. नरेंद्र मोदी हे बचत गटाच्या महिलांशी संवाद साधणार असून तब्बल तीन लाख महिला या मेळाव्यामध्ये सामील होणार आहे. या सभेसाठी भाजपने जय्यत तयारी केली असून एसटी महामंडळाच्या 150  बस सभेसाठी वळवण्यात आल्या आहेत. मात्र यामुळे नागरिकांना त्रास होत असून याबाबत आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

    यवतमाळ येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होणारी सभा निवडणूकीपूर्वी महत्त्वाची ठरणार आहे. यामुळे भाजप महाराष्ट्रकडून या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सभेला उपस्थित राहण्यासाठी राज्यभरातील नागरिकांना ने आण करण्यासाठी हजारो वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठीच बुलढाणा जिल्ह्यातून एसटी महामंडळाच्या 150 बसेस यवतमाळ विभागीय कार्यल्याकडे रवाना करण्यात आल्या आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने बस जिल्ह्यातून बाहेर एका सभेसाठी पाठविण्यात आल्याने जिल्ह्यातील प्रवाससेवा कोलमोडली आहे. बुलढाणा बस स्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी झाली असून प्रवासी सेवा खोळंबली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना देखील नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

    राजकारणासाठी सामान्यांना वेठीस

    याबाबत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत भाजपला सवाल विचारला आहे. रोहित पवार यांनी लिहिले आहे की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या यवतमाळ येथील सभेला गर्दी करण्यासाठी मराठवाडा आणि विदर्भातील सुमारे २०० ST बसेस तिकडे नेण्यात आल्यात. त्यामुळं लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द करण्यात आल्या असून खेडोपाड्यातील प्रवाशी आणि विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. यांच्या राजकारणासाठी भाजप सामान्य लोकांना वेठीस धरून त्यांचे हाल करत आहे. हिच गोष्ट मोदी साहेबांना समजली तर त्यांनाही हे आवडणार नाही आणि यावरून तेही महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना फटकारल्याशिवाय राहणार नाहीत.’ असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले.