
गाईच्या दूध खरेदी दरात वाढ मिळावी व अन्य मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले आंदोलक आक्रमक झाले. रविवारी (दि. १९) आंदोलकांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व दुग्ध विकास मंत्री यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून आरवडे (ता. तासगाव) येथे निषेध व्यक्त केला. दोन आंदोलकांची तब्बेत बिघडली असताना सुद्धा ते उपोषणावर ठाम आहेत.
तासगाव : गाईच्या दूध खरेदी दरात वाढ मिळावी व अन्य मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले आंदोलक आक्रमक झाले. रविवारी (दि. १९) आंदोलकांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व दुग्ध विकास मंत्री यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून आरवडे (ता. तासगाव) येथे निषेध व्यक्त केला. दोन आंदोलकांची तब्बेत बिघडली असताना सुद्धा ते उपोषणावर ठाम आहेत. दरम्यान शनिवार आणि रविवार दोन दिवस शासनाचे प्रतिनिधी फिरकलेच नसल्यामुळे आंदोलक आक्रमक झाले.
गाईच्या दुधाला ३.५ फॅटला शासन आदेशानुसार ३५ रूपये दर देणे बंधनकारक आहे. शासनाचा आदेश झुगारून डेअरी चालकांनी २७ ते ३० रूपये दर केला आहे. यामुळे दुध उत्पादकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. शासन आदेशानुसार किमान ३५ रूपये दर मिळावा, खाद्याचे दर कमी करावे, अशी मागणी करीत शेतकरी नेते जोतिराम जाधव, नागेश पाटील व रामगौड पाटील या तिघांनी दि. १७ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. दूध उत्पादकांची शासन आणि डेअरी चालक संगनमताने फसवणूक करीत आहेत, असा आरोप केला आहे. यावेळी दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासन, डेअरीचालकांविरोधात घोषणाबाजी
रविवारी सकाळी तासगाव भिवघाट महामार्गावर आंदोलन स्थळी आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन केले. शासन आणि डेअरी चालकांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.