ऊस तोडणीसाठी अडवणूक केल्यास आंदोलन; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कामगारांना इशारा

ऊस तोडणी हंगाम शेवटच्या टप्प्यात आला असून अनेक ठिकाणी ऊसतोड कामगारांकडून ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांकडे पैसे मागितले जात आहेत. ऊसतोड कामगारांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून ऊस तोडीसाठी पैसे मागून अडवणूक केली तर गाठ स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी आहे, असा इशारा संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी दिला.

  वडूज : ऊस तोडणी हंगाम शेवटच्या टप्प्यात आला असून अनेक ठिकाणी ऊसतोड कामगारांकडून ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांकडे पैसे मागितले जात आहेत. ऊसतोड कामगारांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून ऊस तोडीसाठी पैसे मागून अडवणूक केली तर गाठ स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी आहे, असा इशारा संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी दिला.

  सूर्याचीवाडी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शाखा उद्घाटन ते प्रसंगी बोलत होते. यावेळी स्वाभिमानी पक्ष जिल्हाध्यक्षश्रीकांत लावंड, स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष दत्तुकाका घार्गे, स्वाभिमानी पक्ष तालुकाध्यक्ष ॲड. प्रमोद देवकर, युवा तालुकाध्यक्ष सचिन पवार , कातर खटाव शाखेचे अविनाश बागल, अजय पाटील, सत्यवान मोहिते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

  पवार म्हणाले, सर्वसामान्य शेतकरी आणि ऊस उत्पादकांना बळ देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना गावोगावी जाऊन संघटनेची बांधणी करत आहे. या मोहिमेला शेतकऱ्याकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच नायकाचीवाडीनंतर, सूर्याचीवाडी ग्रामस्थांनी एकी दाखवत संघटनेच्या शाखेचे उद्घाटन केले. खटाव तालुक्यामध्ये सध्या शेतकरी मोठ्या जोमात ऊसाची लागवड करून ऊस उत्पादन घेण्याला पसंती देतात. त्यामुळे उसाची लागवड मोठ्या प्रमाणत वाढली आहे.

  तालुक्यातून जरंडेश्वर, पडळ, गोपुज आणि वर्धन कारखान्याकडून गाळपासाठी जास्तीत जास्त ऊस नेण्याचा प्रयत्न केला जात अाहे. या शिवाय इतर कारखान्यांकडून गेट केन च्या माध्यमातून ऊस नेण्याचा प्रयत्न होत अाहे. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य सूर्यकांत भुजबळ यांच्या हस्ते स्वाभिमानी च्या नाम फलकाचे अनावरण करण्यात आले. सूर्याचीवाडी शाखा अध्यक्ष म्हणून हणमंत घोलप तर उपाध्यक्ष म्हणून लालासो जाधव यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी वैभव पाटील, संतोष तुपे यांनी मनोगते व्यक्त केली.

  ताेडणीसाठी पैशाची मागणी

  ऊस ताेडणीसाडी मजुरांकहून एकरी चार ते पाच हजाराची मागणी सुरू आहे. चालकाकडून 300 ते 400 रुपये एन्ट्री मागितली जात आहे. असा प्रकार घडल्यास शेतकऱ्यांनी संघटनेशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुकाध्यक्ष दत्तुकाका घार्गे यांनी केले आहे.

  आक्रमक पावले उचलणार

  ऊस ताेडणीसाठी मजुरांकडून पैशासाठी शेतकऱ्यांना त्रास होऊ लागला आहे. अनेकदा ऊस तोडणीसाठी मुकादम शेतकऱ्यांकडे पैसे मागतात. शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याच्या तक्रारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे येत आहेत. याबाबत साखर कारखान्यानी योग्य कार्यवाही केली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना तोडणी कामगार आणि मुकादम यांच्या विरोधात आक्रमक पावले उचलेल, असा इशारा पवार यांनी दिला.