नवऱ्याच्या सुट्टीसाठी बायको थेट ऑफिसात, आटपाडी आगारात बायकोचं ठिय्या आंदोलन, मग काय ड्रामाच..

सांगलीत सध्या एका बायकोच्या आंदोलनाची (Agitation of Wife) जबरदस्त चर्चा सुरु आहे. नवऱ्याला सुट्टी मिळत नाही त्यामुळं सुट्टीसाठी थेट बायकोनंच आंदोलन (Agitation for Leave) केल्याचा प्रकार आटपाडीत घडलाय.

सांगली : सांगलीत सध्या एका बायकोच्या आंदोलनाची (Agitation of Wife) जबरदस्त चर्चा सुरु आहे. नवऱ्याला सुट्टी मिळत नाही त्यामुळं सुट्टीसाठी थेट बायकोनंच आंदोलन (Agitation for Leave) केल्याचा प्रकार आटपाडीत घडलाय. एसटी कर्मचारी असलेल्या पतीला सुट्टी मिळाली, यासाठी पत्नीनं आटपाडी डेपो प्रमुखांच्या केबिन बाहेरच ठिय्या आंदोलन सुरु केलं. केबिनबाहेर चादर टाकून, पत्नी त्या ठिकाणी झोपून राहिली. नलिनी कदम असं या महिलेचं नाव आहे.

काय घडला प्रकार?

आटपाडी आगारात नोकरीला असलेल्या एसटी कर्मचारी विलास कदम यांच्या नलिनी या पत्नी आहेत. विलास कदम गेल्या ३३ वर्षांपासून एसटी सेवेत कार्यरत आहेत.पुढच्या दोन अडीच महिन्यांत ते निवृत्त होणार आहेत. त्यांची सद्यस्थितीला ९ महिन्यांची सुट्टी शिल्लक आहे. पत्नीच्या आजारपणासाठी दोन दिवसांची सुट्टी मिळावी, असा अर्ज त्यांनी केला होता. डेपोच्या प्रमुखांनी हा अर्ज नाकारल्यानं त्यांची पत्नी संतापली. नलिनी यांनी थेट एसटी डेपो गाठला आणि डेपो प्रमुखांसमोरच आंदोलनाला सुरुवात केली.

आंदोलनानंतर वरिष्ठांची पळापळ

वाहनचालक असलेल्या विलास कदम यांची पत्नी डेपो प्रमुखांच्या केबिनसमोर आंदोलन करत असल्याची बातमी लगेचच पसरली. त्यानंतर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची पळापळ झाली. सगळे बडे अधिकारी आटपाडी डेपोत पोहचले, पोलिसांनाही बोलावण्यात आलं. मात्र, इतकं करुनही विलास कदम यांना सुट्टी मिळाली नाहीच.

नलिनी कदम यांच्यावर गुन्हा दाखल

पतीच्या रजेसाठी आंदोलन करणाऱ्या नलिनी कदम यांच्यावर डेपोकडून गुन्हा दाखल करण्यात आला. कदम यांच्या पत्नीनं काही जणांना शिवीगाळ केल्याची तक्रारही नोंदवण्यात आली. यावर विलास कदम यांनी हे आरोप चुकीचे असल्याचं म्हटलंय. ज्या एसटीसाठी आणि प्रवाशांसाठी ३३ वर्ष काम केलं, त्यांनी आपल्याला निवृत्तीच्या काळात अशी वागणूक देणं अयोग्य असल्याचं त्यांनी सांगितलंय.