agricultural minister abdul sattar in exhibition

सगळे पवार चांगले आहेत, त्यांची ‘पॉवर’अशीच कायम राहो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना, अशा शब्दात राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Agricultural Minister Abdul Sattar) यांनी पवार कुटुंबियांबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या.

  बारामती: राज्यामध्ये इतर कुठल्याही ठिकाणी पाहिलेल्या प्रदर्शनापेक्षा बारामतीचे (Baramati) कृषी प्रदर्शन (Agricultural Exhibition) हे अत्यंत वेगळं आहे, नवखं आहे आणि राज्याला नव्हे तर देशाला दिशा देणारे आहे, असे मत राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Agricultural Minister Abdul Sattar) यांनी व्यक्त केले. तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार, स्व. अप्पासाहेब पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, राजेंद्र पवार, रोहित पवार यांनी अखंडपणे केलेल्या कामामुळे आपण प्रभावित झालो असल्याचे गौवोद्गार त्यांनी यावेळी बोलताना काढले. आपण याठिकाणी कृषी मंत्री म्हणून आलो आहे, इथे मी राजकीय पुढारी म्हणून आलो नाही, सगळे पवार चांगले आहेत, त्यांची ‘पॉवर’अशीच कायम राहो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना, अशा शब्दात सत्तार यांनी पवार कुटुंबियांबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या.

  बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनास आज कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी भेट दिली. त्यांनी कृषी केंद्राने आयोजित केलेल्या १७० एकर प्रक्षेत्रावरील पिकांच्या जिवंत प्रात्यक्षिकांसह कृषी क्षेत्रातील नव तंत्रज्ञान पाहिले आणि त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे, केंद्र प्रमुख डॉ. धीरज शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

  सत्तार म्हणाले, देशाच्या इतर राज्यांची परिस्थिती पाहिल्यानंतर तेथील कृषी शिक्षण आणि विस्तारामध्ये खाजगी विद्यापीठांना मान्यता आहे, परंतु महाराष्ट्रात तशी मान्यता नाही. त्यामुळे अशी मान्यता असेल तर कृषी संशोधनाला बाळ मिळेल आणि त्यातून अधिक चांगलं कृषी क्षेत्रासाठी भरीव काम करता येईल. यासाठी मी लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना भेटून यासंदर्भातील प्रस्तावाला चालना देण्याचा प्रयत्न करणार आहे. भविष्यात खाजगी कृषी विद्यापीठे यावीत आणि त्यांनी कृषी क्षेत्राचा विस्तार आणि विकास करावा असं माझं देखील स्वतःचं मत आहे असं ते म्हणाले.

  ते म्हणाले की, बारामतीतील कृषी प्रदर्शन पाहिल्यानंतर मी राजेंद्र पवार यांना विनंती केली की, त्यांनी मराठवाडा आणि विदर्भ या काहीशा शेतीमध्येमागे असलेल्या भागातील शेतीला सुधारण्यासाठी देखील प्रयत्न करावेत. त्यांनी त्यांचा काही प्रयोग त्या ठिकाणी केल्यास तेथील शेतकऱ्यांना देखील शेती विकासासाठी अधिक दिलासा मिळेल असे माझे स्वतःचे मत आहे.

  कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून अनेक पिकांच्या नवीन वाणांचे उत्पादन पाहिल्यानंतर अब्दुल सत्तार देखील भारावून गेले. त्याचबरोबर बारामतीत अशा प्रकारच्या कृषी प्रदर्शनाची व्यवस्था पाहून मी अतिशय प्रभावीत झालो असून आजवर मी राज्यात गेल्या 30 वर्षात जेवढी प्रदर्शने पाहिली, त्यामध्ये जिवंत पिकांचा प्रात्यक्षिकांचा अनुभव अजिबात नव्हता. मात्र या ठिकाणी आल्यानंतर शेतीत नेमके काय करायला हवे, याचा योग्य तो मूलमंत्र शेतकऱ्यांना मिळेल याच्यावर माझा विश्वास बसला असे ते म्हणाले.

  दरम्यान यावेळी पत्रकारांशी बोलताना अब्दुल सत्तार यांनी बारामतीतील ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने महिला शिक्षणाबाबत होत असलेल्या कामाची, सकाळी केलेल्या पाहणीची माहिती सांगितली.

  ते पुढे म्हणाले, मी महिला शिक्षणावरील ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित दादा, सुप्रियाताई, रोहित पवार, कै. आप्पासाहेब पवार, राजेंद्र पवार यांनी अखंडपणे केलेल्या या कामामुळे मी प्रभावित झालो आहे. देशी गोवंश सुधार प्रकल्प पाहिला आणि मी अक्षरशः प्रभावित झालो. महिलांना त्यांच्या पायावर उभा करण्याचे सुनंदा पवार या करत असलेल्या कामाची मला अगोदरच माहिती होती, मात्र या ठिकाणी आल्यानंतर हे काम किती विस्तार आहे, हे मला पाहायला मिळाले.

  विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या कृषी प्रदर्शनास भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी कृषी प्रदर्शनात सहभागी झालेल्या स्टॉलला भेट देऊन माहिती घेतली. या कृषी प्रदर्शनातील आधुनिक पीक पद्धतीची प्रात्यक्षिके पाहून सविस्तर माहिती घेतली. प्रदर्शनातील विषमुक्त शेती लागवड पद्धत, होमिओपॅथिक शेती पद्धत, फुल शेती यासह इतर अनेक शेती विषयक तंत्रज्ञानाची पाहणी केली.