आंबेगावात कृषी पंप केबल चोऱ्यांचे सत्र, वाढत्या चोऱ्यांनी शेतकरी हैराण; चोरट्यांचा बंदोबस्त कारण्याची मागणी

ऐन कांदा लागवडीच्या काळात नदीकाठी असलेल्या शेतकऱ्यांच्या शेताला पाणी पुरवठा करणाऱ्या शेती पंपाच्या विद्युत मोटारीच्या केबलमधील तारा चोरीला जाण्याचे सत्र काही थांबत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. पोलिसांनी याची चौकशी करून केबल चोरट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

    आंबेगाव : तालुक्याच्या पूर्वभागात ऐन कांदा लागवडीच्या काळात नदीकाठी असलेल्या शेतकऱ्यांच्या शेताला पाणी पुरवठा करणाऱ्या शेती पंपाच्या विद्युत मोटारीच्या केबलमधील तारा चोरीला जाण्याचे सत्र काही थांबत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. पोलिसांनी याची चौकशी करून केबल चोरट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

    सहा शेतकऱ्यांचा केबलची चोरी

    तालुक्यातील निरगुडसर येथे मंगळवारी (दि.२० ) रात्रीच्या वेळी घोडनदी काठी असलेल्या विद्युत पंपाच्या केबली अज्ञात चोरट्यानी लंपास केल्या आहेत. शेतकरी कुंडलीक टाव्हरे, नवनाथ टाव्हरे, कांताराम टाव्हरे, महेंद्र भोर, संजय टाव्हरे, सावळेराम शेळके या शेतकऱ्यांच्या अंदाजे ४० हजार रुपये किंमतीच्या केबली चोरीला गेल्या आहेत. या सर्व शेतकऱ्यांनी पारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या घटनेचा तपास पारगाव पोलीस ठाण्याचे साहय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे करित आहेत.

    कांदा लागवडीत अडथळे

    सध्या तापमानात वाढ झाल्याने शेतातील पिकांना दर ३ ते ४ दिवसांनी पाणी देणे गरजेचे आहे. तसेच अनेक गावांमध्ये सध्या कांदा लागवड सुरू असल्याने शेतकऱ्यांची कांदा लागवड करण्यासाठी धावपळ सुरू असते. पूर्व भागातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतीला पुरवठा करणारे विद्युत पंप नदीकाठी असल्याने चोरट्यांनी केबलमधील विद्युत तारा काढून नेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लागवडीत अडथळे येऊ लागल्याने बळीराजा हतबल झाला आहे.

    लाखो रुपये किंमतीच्या केबल लंपास

    वाढत्या केबल चोरीच्या घटनांनी कांदा लावगड कशी करावी आणि शेतातील पिकांना पाणी कसे द्यावे, ही चिंता शेतकऱ्यांना लागलेली आहे. घोड नदी व मीना नदीकाठी आणि गावातील सार्वजनिक पाणी पुरवठा करणारे विद्युत पंप व शेतीला पाणी पुरवठा करणारे विद्युत पंप आहेत. तालुक्यात गेल्या वर्षभरात लाखो रुपये किंमतीच्या विद्युत पंपाच्या केबली रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. भरमसाठ लाईट बील शेतातील मालाला बाजार भाव मिळत नसल्याने शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे आणि त्यामध्येच विद्युत केबली चोरीला जात असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.