कृषी मंत्रालयाचा पदभार स्वीकारताच धनंजय मुंडेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय; पहिल्याच बैठकीत…

महाडीबीच्या माध्यमातून सर्वांनाच 'मागेल त्याला' अशा स्वरूपातील योजनांमध्ये लॉटरी पद्धत बंद झाली पाहिजे. अर्ज केलेल्या पात्र शेतकऱ्याला लाभ मिळाला पाहिजे. त्याचवेळी शासनाचा 'मागेल त्याला' लाभ देण्याचा उद्देश यशस्वी होईल.

    मुंबई : महाडीबीच्या माध्यमातून सर्वांनाच ‘मागेल त्याला’ अशा स्वरूपातील योजनांमध्ये लॉटरी पद्धत बंद झाली पाहिजे. अर्ज केलेल्या पात्र शेतकऱ्याला लाभ मिळाला पाहिजे. त्याचवेळी शासनाचा ‘मागेल त्याला’ लाभ देण्याचा उद्देश यशस्वी होईल. ‘मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला ठिबक सिंचन संच’ अशा योजनांचा अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला लाभ देण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिली.

    तसेच यासाठी अर्ज प्रक्रिया कमी कालावधीची व सोपी करावी, अशा सूचना देण्यात आल्याचे ते म्हणाले. कृषिमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री मुंडे यांनी मंत्रालयात कृषी विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये आढावा घेताना ते बोलत होते. बैठकीला प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, सहसचिव सरिता बांदेकर आदींसह कृषी विभागाचे संचालक उपस्थित होते.

    कृषी पीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त सहभाग वाढविण्याच्या सूचना देत मंत्री मुंडे म्हणाले की, एक रुपया भरून शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होता येणार आहे. शेतकऱ्यांचा विमा हप्ता राज्य शासन भरणार आहे.