Agriculture supervisor caught red-handed taking bribe, demanded money to rectify error in tractor case

मुंडीकोटा येथील कृषी पर्यवेक्षक खंडाईत याने संबंधित बिले व पावती पाहून व्यावसायिक परीक्षण रिपोर्टमध्ये नावावरून त्रुटी काढली. तसेच ही त्रुटी न करता सदर प्रस्ताव मान्य करून शासनाकडे अनुदान रकमेच्या मंजुरीकरिता पाठविण्यास अर्जदार शेतकर्‍यास १० हजार रुपयांची मागणी केली.

    तिरोडा : कृषी विभागाच्या योजनेतून शेतकऱ्याला मंजूर झालेला ट्रॅक्टर खरेदी करून त्याच्या अपलोड केलेल्या बिल, पावतीच्या व्यावसायिक परीक्षण रिपोर्टमध्ये त्रुटी काढून १० हजारांची लाच मागणे, कृषी पर्यवेक्षकाला चांगलेच भोवले आहे. त्रुटी न करता सदर प्रस्ताव मान्य करून अनुदान रकमेच्या मंजूरीसाठी शासनाकडे पाठविण्यास अर्जदार शेतकऱ्याकडून तडजोडीअंती ८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना कृषी पर्यवेक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. प्रेमानंद पांडुरंग खंडाईत असे त्या लाचखोर कृषी पर्यवेक्षकाचे नाव आहे. ही कारवाई ११ मे रोजी तिरोडा बस स्थानकासमोर चहा टपरीवर करण्यात आली.

    तिरोडा तालुक्याच्या गिरणा येडमाकोट येथील एका शेतकऱ्याच्या नावे असलेल्या शेतीवर कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान २०२१-२२ करिता तक्रारदाराने ऑनलाइन अर्ज केला. त्यानुसार त्यांना ट्रॅक्टर मंजूर झाला. ट्रॅक्टर खरेदी करून त्याची बिल, पावती अपलोड करण्यात आली. त्यानंतर मुंडीकोटा येथील कृषी पर्यवेक्षक खंडाईत याने संबंधित बिले व पावती पाहून व्यावसायिक परीक्षण रिपोर्टमध्ये नावावरून त्रुटी काढली. तसेच ही त्रुटी न करता सदर प्रस्ताव मान्य करून शासनाकडे अनुदान रकमेच्या मंजुरीकरिता पाठविण्यास अर्जदार शेतकर्‍यास १० हजार रुपयांची मागणी केली.

    त्यावेळी तक्रारदाराने नाईलाजाने होकार दिला. मात्र लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी १० मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे तक्रार दाखल केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ११ मे रोजी लाच मागणीच्या तक्रारीची योग्य पडताळणी केली. तसेच, तिरोडा बस स्थानकासमोर चहा टपरीवर सापळा रचून कृषी पर्यवेक्षक प्रेमानंद पांडुरंग खंडाईत याला पंचासमोर ८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. तिरोडा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक मधुकर गीते, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदियाचे पोलीस उपअधीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अतुल तवाडे, पोलीस हवालदार मिल्की राम पटले, संजय बोहरे, नायक पोलीस शिपाई राजेंद्र बिसेन, मंगेश कहालकर, अशोक कापसे, संतोष बोपचे, चालक दीपक वाटबर्वे यांनी केली.