महाराष्ट्र केसरीचे यजमानपद यंदा अहमदनगरला

    अहमदनगर : कुस्ती (Wrestling) या रांगड्या खेळासाठी प्रसिद्ध असलेली राज्यातील सर्वात मोठी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यंदा अहमदनगर जिल्ह्यात खेळवली जाणार आहे. येणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे यजमानपद अहमदनगर जिल्ह्याला मिळाले असून आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. स्पर्धेचे यजमानपद मिळावे, यासाठी पुणे, ठाणे आणि वेल्हे आदींसह काही कंपन्याही आग्रही होत्या परंतु स्पर्धा आयोजनाचा मान नगरलाच देण्यात आला. अहमदनगरच्या कुस्तीपटूंनसाठी ही आनंदाची बाब आहे.

    ६५ वी वरिष्ठ गट गादी, माती राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा (अधिवेशन) आणि महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती लढत स्पर्धेच्या नियोजनासाठी आज बैठक झाली. त्यात नगरच्या यजमानपदावर शिक्कामोर्तब करण्यात आले. महाराष्ट्रात अनेक ठिकाणांहून स्पर्धा आयोजनाची मागणी होती; परंतु सर्वांगीण विचार करता नगरचा दावा उजवा ठरला.