उड्डाणपूल बांधकामासाठी नगरला माती परीक्षण

खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी हा उड्डाणपूल पूर्ण होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. मागीलवर्षी या उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले.

    अहमदनगर : अहमदनगर शहरात आता आणखी एक उड्डाणपूल होणार असून, त्याचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी गुरूवारी (दि. 28) संबंधित जागेच्या मातीचे परीक्षण करण्यात आले. पोलीस अधीक्षक चौक ते एमआयडीसीतील सह्याद्री चौक असा हा उड्डाणपूल होणार आहे.

    शहरातील पहिला उड्डाणपूल सक्कर चौक ते कोठला या दरम्यान झाला आहे. दिवंगत भाजप नेते व माजी खासदार दिलीप गांधी यांनी हा उड्डाणपूल मंजूर होण्यासाठी प्रयत्न केले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना गळ घालून त्यांनी यासाठी निधी उपलब्ध केला होता. त्यानंतर झालेले खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी हा उड्डाणपूल पूर्ण होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. मागीलवर्षी या उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले.

    शहरातून जाणारी जड वाहतूक वळण रस्त्याने वळविली असली तरी वाढती वाहतूक लक्षात घेता आणखी एका उड्डाणपुलाची गरज होती. त्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खा. सुजय विखे पाटील यांनी प्रयत्न करून नवीन उड्डाणपूल मंजूर करून घेतला. पोलीस अधीक्षक चौक, पत्रकार चौक ते एमआयडीसीतील सह्याद्री चौक असा हा उड्डाणपूल आहे. त्याचे काम सुरू होण्यापूर्वी प्रशासनाने गुरूवारी पोलीस अधीक्षक चौकात बांधकामाच्या ठिकाणच्या मातीचे परीक्षण केले. या माध्यमातून शहर विकासात भर पडणार आहे.