‘ अहमदनगर ’ चे सुध्दा होणार लवकरच नामांतर,  हे असेल नवीन नाव

अहमदनगरचे नाव अंबिकानगर करण्याची मागणी शिवसेनेने याआधी केली होती, मात्र त्यानंतर आता भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट विधिमंडळात याबाबत मागणी करून सरकारी भूमिका काय? असा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर बोलताना मंत्री दीपक केसरकर यांनी अहमदनगरच्या नामांतराबाबत सरकार सकारात्मक असल्याची माहिती दिली होती.

    अहमदनगर – अहमदनगरचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याची मागणी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानपरिषदेत केली होती. या मागणीनंतर सरकारने नामांतराच्या हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अहमदनगर महानगरपालिकेच्या महासभेच्या ठरावाची प्रत मागवण्यात आली आहे. यावरून स्थानिक नेत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

    अहमदनगरचे नाव अंबिकानगर करण्याची मागणी शिवसेनेने याआधी केली होती, मात्र त्यानंतर आता भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट विधिमंडळात याबाबत मागणी करून सरकारी भूमिका काय? असा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर बोलताना मंत्री दीपक केसरकर यांनी अहमदनगरच्या नामांतराबाबत सरकार सकारात्मक असल्याची माहिती दिली होती. याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रस्ताव देखील मागवले असल्याचे त्यांनी सांगितले होते. शासन स्तरावर आता हालचाली सुरू झाल्या असून जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेकडे तसा ठरावाची प्रत मागवली आहे.

    अहमदनगरच्या नामांतराबाबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष यांनी स्पष्ट भूमिका घेतली असली तरी इतर पक्षांनी यावर सावध पवित्रा घेतला आहे. नामांतराने शहराचा आणि जिल्ह्याचा विकास होणार नाही, आधी विकास महत्वाचा अशी प्रतिक्रिया विविध पक्षाच्या नेत्यांनी घेतली आहे.

    याबाबत ठरावाची प्रत मागवल्याने मनपाची महासभा बोलावली जाणार का? या ठरावला स्थानिक नगरसेवक कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. अहमदनगरच्या नामांतराबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी जरी विधिमंडळात मागणी केली नसली तरी याबाबत शासनस्तरावर हालचाली सुरू झाल्याने येत्या काळात हा मुद्दा पुन्हा गाजणार असल्याचे चित्र आहे.