विमानतळ भरावामुळे पुराचा धोका कायम; तहसीलदार विजय तळेकर यांचा सिडको प्रशासनाकडे युद्धपातळीवर पाठपुरावा सुरु

मौजे पारगाव डुंगी, पारगाव, तसेच बंबावी कोळीवाडा येथे विमानतळाच्या गाभाक्षेत्रासाठी करण्यात आलेल्या मातीच्या भरावामुळे तेथील नागरिकांचे राहत्या घरात पाणी जाऊन आतोनात नुकसान होते. या संदर्भात पनवेल तहसीलदार विजय तळेकर यांनी सक्रिय भूमिका घेऊन गावकरी आणि सिडको प्रशासन चर्चा घडवून आणली आहे.

  • मौजे पारगाव डुंगी, पारगाव, बंबावी कोळीवाडा पूरग्रस्त गावे

पनवेल : पनवेलमध्ये (Panvel) नवी मुंबई विमानताळामुळे (Navi Mumbai Airport) पनवेल परिसराला ग्लॅमर येऊन व विकासाची गंगा येईल याबाबत दुमत नाही, पण या विमानतळासाठी होत असलेल्या भरावामुळे (Filler) दरवर्षी पूरग्रस्त (Flooded) परिस्थिती उद्भवत आहे. त्याचबरोबर विमानतळाच्या भरावामुळे आजूबाजूचा परिसर सुद्धा पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मौजे पारगाव डुंगी, पारगाव, तसेच बंबावी कोळीवाडा येथे विमानतळाच्या गाभाक्षेत्रासाठी करण्यात आलेल्या मातीच्या भरावामुळे तेथील नागरिकांचे राहत्या घरात पाणी जाऊन आतोनात नुकसान होते. या संदर्भात पनवेल तहसीलदार विजय तळेकर यांनी सक्रिय भूमिका घेऊन गावकरी आणि सिडको प्रशासन चर्चा घडवून आणली आहे. दरवर्षी मौजे पारगाव डुंगी, पारगाव तसेच बंबावी कोळीवाडा या गावांमध्ये पावसामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी तहसीलदार विजय तळेकर यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे बाधित गावकऱ्यांकडून त्यांचे आभार मानण्यात येत आहेत.

१०० घरांचे पारगाव

विमानतळ प्रकल्पग्रस्तांप्रमाणे प्रत्येक घराला तीनपट बांधकाम खर्च, घर बांधण्यासाठी जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गावाची लोकसंख्या सुमारे साडेचारशे इतकी असून गावात १०० घरे आहेत. पावसाळ्यात गावात पाणी शिरून नुकसान होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी आताच घरे स्थलांतरित करून भाडेतत्त्वावर इतर ठिकाणी राहायला जाण्याचा सिडकोचा प्रस्ताव या आधीच दिला होता. पावसाळ्यापुरते भाडे देण्यास सिडकोने सकारात्मक प्रतिसाद सुद्धा दिला होता, परंतु कुठलेही लेखी स्वरूपात झालेला निर्णय मिळत नसल्याने भर पावसात डुंगी गावच्या ग्रामस्थांनी गाव सोडण्यास नकार दिला.

ग्रामस्थांच्या सर्व मागण्या

गावात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शिरल्याने तत्कालीन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र आणि प्रांताधिकारी दत्तात्रय नवले यांनी ग्रामस्थांन बरोबर चर्चा करून अखेर यशस्वी मार्ग काढण्यात यश मिळवले होते. तेव्हा पूरग्रस्त डुंगी गावातील ग्रामस्थांच्या सर्व मागण्या मान्य करून त्यांची तात्पुरत्या स्वरूपात चिंचपाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत व्यवस्था करून त्यांच्या जेवणाची सुद्धा प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु आता त्या वेळेसारखी परिस्थिती उद्भवू नये म्हणून महसूल विभागातर्फे तहसीलदार विजय तळेकर यांनी आतापासूनच कंबर कसली आहे.

२२२ हेक्टर जागेवर नवीन वसाहत

विमानतळबाधित दहा गावांतील सुमारे तीन हजार कुटुंबांचे वडघर, वहाळ आणि कुंडे वहाळ येथे पुनर्वसन करण्यात येत आहे. पुनर्वसन व पुन:स्थापनेअंतर्गत २२२ हेक्टर जागेवर नवीन वसाहत उभारली जाणार आहे. त्यानुसार या क्षेत्रात शाळा, नागरी आरोग्य केंद्र, समाजमंदिर आदी सुविधांची पूर्तता करण्यात आली आहे. तसेच महिला भवन, अंगणवाडी, प्रशासकीय भवन व स्मशानभूमीची कामे प्रगतिपथावर आहेत.

नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना

विमानतळासाठी करण्यात आलेल्या भरावामुळे परिसरातील डुंगी गावामध्ये गतवर्षी पाणी शिरले होते. यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. भरावाचे काम सुरू झाल्यानंतरच्या पहिल्याच पावसाने धोक्याचा इशारा दिल्यानंतर या गावचेही दहा गावांप्रमाणे पुनर्वसन केले जावे, अशी मागणी होऊ लागली होती. केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र पुणे यांनीही त्यांच्या अहवालामध्ये डुंगी गावाचे पुनर्वसन करण्याबाबतची शिफारस केली होती. त्याचप्रमाणे सिडकोने मार्च २०१६ मध्ये राज्याचे निवृत्त मुख्य सचिव जयंत बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमली होती. त्या समितीनेही डुंगी गावच्या मूळ जागी किंवा नवीन जागेवर पुनर्वसन करण्याची शिफारस केली होती.

डुंगी गावाच्या अगदी लगत करण्यात आलेल्या विमानतळाच्या भरावामुळे गावापेक्षा भराव उंचीवर गेला आहे. भरावानंतर झालेल्या पहिल्याच पावसात गावात पाणी शिरल्यामुळे भविष्यात काय परिस्थिती उद्भवेल, या भीतीने आम्ही ग्रामस्थ दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर चिंताग्रस्त असतो. सिडको प्रशासनाने याबाबत कायमस्वरूपी उपायोजना करणे अत्यंत गरजेचे आहे.

– तुकाराम म्हात्रे, ग्रामस्थ

मौजे पारगाव डुंगी, पारगाव तसेच बंबावी कोळीवाडा या गावांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून पावसाळ्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होत असते, आपत्कालीन मदत करताना प्रशासनाची तारांबळ होत असते. त्याचबरोबर या गावातील नागरिकांची पूर आल्यामुळे वित्तहानी होत असते. याबाबत कायस्वरूपी निर्णय सिडको प्रशासनाने लवकरात लवकर घेणे आवश्यक आहे.

– विजय तळेकर, तहसीलदार, पनवेल