शिवसेनेच्या विधानसभा गटनेतेपदी अजय चौधरी यांची नियुक्ती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेते आणि आमदारांची महत्वाची बैठक वर्षा निवासस्थानी घेतली. या बैठकीत आमदार अजय चौधरी यांना शिवसेनेचे गटनेते करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या निवडीची घोषणा होताच शिवसेना प्रतोद सुनील प्रभू, मंत्री उदय सामंत यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची भेट घेतली.

    मुंबई : शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या २२ समर्थक आमदारांसह सुरत गाठले. एकनाथ शिंदे यांच्या या बंडामुळे विधानसभेच्या शिवसेना गटनेतेपदावरून एकनाथ शिंदे याना हटवून त्यांच्या जागी शिवडी मतदारसांघातून निवडून आलेले आमदार अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेते आणि आमदारांची महत्वाची बैठक वर्षा निवासस्थानी घेतली. या बैठकीत आमदार अजय चौधरी यांना शिवसेनेचे गटनेते करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या निवडीची घोषणा होताच शिवसेना प्रतोद सुनील प्रभू, मंत्री उदय सामंत यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची भेट घेतली. यावेळी विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांच्या उपस्थितीत उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना शिवसेनेच्या वतीने अजय चौधरी यांची गटनेतेपदी निवड झाल्याचे पत्र देण्यात आले.

    अजय चौधरी हे दक्षिण मध्य मुंबईतील शिवडी मतदार संघातून विधानसभेत निवडून आले आहेत. शिवसेनेतील वरिष्ठ आणि विश्वासू नेते मानले जात आहेत. शिवसेनेच्या विविध आंदोलनात त्यांनी पुढाकार घेतला असून शिवसेनेचे दक्षिण मध्य मुंबईचे विभाग प्रमुख म्हणून त्यांनी वीस वर्ष जबाबदारी सांभाळली आहे.

    २०१४ साली शिवडी मतदारसंघातून मनसेच्या बाळा नांदगावकर यांचा पराभव करून ते विधानसभेत निवडून आले. २०१५ मध्ये शिवसेनेने त्यांच्याकडे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख पद दिले. २०१९ साली शिवसेनेने त्यांना पुन्हा एकदा तिकीट दिले. २०१९ साली विधानसभेवर निवडून आले.