सरकारमधील वाचाळवीरांना आवरा, अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना सल्ला

या वाचाळवीरांना आवरा... त्यांना ताबडतोब सूचना द्या... महाराष्ट्राची जी परंपरा त्याला गालबोट लावू देऊ नका. महाराष्ट्राच्या परंपरेला जपलं पाहिजे, ती महाराष्ट्राची संस्कृती आहे. परंतु आज विधारक चित्र पाहायला मिळत आहे, हे कुठेतरी थांबले पाहिजे असे स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

    मुंबई – तुमच्यामध्ये वाचाळवीरांचे मोठं प्रस्थ वाढले आहे. काही मंत्री बोलत आहेत त्यातून मंत्रिमंडळाची प्रतिमा खराब होत आहे. लोक ऐकून घेत असतात…पहात असतात…लक्षात ठेवत असतात… काहीजण सहज बोललो म्हणत आहेत… तुम्ही सहज बोलायला नागरीक नाही…तुम्ही राज्याचे प्रतिनिधी आहात, मंत्री आहात. तुम्ही शपथ घेतलेली आहे. तुमच्यावर एक जबाबदारी दिलेली आहे, अशा शब्दात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारमधील वाचाळवीरांना खडसावले. आज जनता दरबार उपक्रमास आले असता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमधील वाचाळ मंत्र्यांवर सडकून टिका केली.

    दरम्यान, मध्यंतरी अब्दुल सत्तार हे माझी बहीण सुप्रिया हिला काही बोलले. विनाशकाले विपरीत बुद्धी. हेच त्यांना बोलले पाहिजे. काय आपण बोलतोय. मंत्री केलं म्हणजे वेगळे झाले का. मंत्री पदे येतात… जातात… कोण आजी… कोण माजी असतात. परंतु शेवटी आपण नागरीक आहोत संविधान, कायदा, नियम याचा सर्वांनी आदर करायचा असतो पण यामध्ये हे चुकत आहेत, असे स्पष्ट मत अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केले. या वाचाळवीरांना आवरा… त्यांना ताबडतोब सूचना द्या… महाराष्ट्राची जी परंपरा त्याला गालबोट लावू देऊ नका. महाराष्ट्राच्या परंपरेला जपलं पाहिजे, ती महाराष्ट्राची संस्कृती आहे. परंतु आज विधारक चित्र पाहायला मिळत आहे, हे कुठेतरी थांबले पाहिजे असे स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

    राज्याचा नावलौकिक आहे तो ढासळू देता कामा नये.पण काही आयपीएस आणि आयएएस अधिकारी जे जवळचे असतात त्यांनी जाऊन हे लवकर दुरुस्त केले तर सर्वांनाच अडचणीचं होणार आहे हे सांगितले पाहिजे. तशापध्दतीने पुढच्या गोष्टी व्हाव्यात जी महाराष्ट्राची यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेली परंपरा, घडी आहे ती घडी विस्कटू न देता सत्ताधारी पक्षाचे लोक, मंत्रीमंडळातील लोक चुकत असतील तर त्यांना स्पष्ट सांगितले पाहिजे असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.

    मुंबई आणि परिसरात गोवर रोगाची साथ जोरात आहे. राज्यसरकारचा आरोग्य विभाग काय उपाययोजना करतोय. तो यामध्ये कमी पडत आहे. त्यांनी घरोघरी जाऊन काम करण्याची आवश्यकता आहे. कोरोनाकाळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सतत संपर्कात होते, हेही आवर्जून सांगितले.