
पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होत असताना, राष्ट्रवादीमधील उभी फूट आता राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई बनत चालली आहे. दिवसें दिवस राष्ट्रवादीतील वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षs कोण? हा वाद आता थेट निवडणूक आयोगाकडे पोहोचला आहे. अजित पवार गटानं पक्षावर व निवडणूक चिन्हावर दावा सांगितल्यानंतर आता राष्ट्रीय अध्यक्षपदही आमच्याकडे असल्याची भूमिका अजित पवार गटानं घेतली आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीसुद्धा कडक भूमिका घेत आपणच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असून जयंत पाटील महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असल्याची भूमिका मांडली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वेगवेगळे दावे केले जात असताना आता खुद्द अजित पवारांनीच आपण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं विधान केलं आहे.
काय म्हणाले होते शरद पवार?
हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात बोलताना पक्षाच्या सर्व ५३ आमदारांनी शरद पवारांना सरकारमध्ये सहभागी होण्यासंदर्भात पत्र दिलं होतं, असं विधान केलं. त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवारांनी “त्यांनी पत्र दिलं होतं, पण त्यावर चर्चा झाली होती, निर्णय नाही. चर्चा आणि निर्णय यात फरक आहे. जयंत पाटील पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष आहेत आणि मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे. यासंदर्भातला निर्णय आमच्याकडून होईल”, अशा आशयाचं विधान केलं होतं.
सुनील तटकरे म्हणतात, अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष
एकीकडे शरद पवारांनी भूमिका स्पष्टपणे मांडली असताना दुसरीकडे सुनील तटकरे अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष असल्याची भूमिका मांडताना दिसले. “निवडणूक आयोगाकडून आमच्या बाजूने निर्णय लागेल असा आम्हाला विश्वास आहे. अजित पवार आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत हे आम्ही याचिकेत सांगितलं आहे. त्यामुळे त्यासंदर्भात योग्य तो निर्णय होईल”, असं सुनील तटकरे म्हणाले.
कौतुक की टोला? अजित पवारांची चंद्रकांत पाटलांवर मिश्किल टिप्पणी; पत्रकाराला म्हणाले, …
अजित पवारांनी केलं शिक्कामोर्तब
दरम्यान, आत्तापर्यंत पक्षाच्या अध्यक्षपदाविषयी अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली नव्हती. मात्र आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी यावर वक्तव्य केलं आहे. सुनील तटकरेंनी केलेल्या विधानाबाबत पत्रकारांनी अजित पवारांची प्रतिक्रिया विचारली असता त्यावर “मला माझ्या सहकाऱ्यांनी केलं आहे. त्यामुळे मी आहे”, असं अजित पवार म्हणाले आहेत.
भुजबळांचं भाषण नीट ऐकलंच नाही!
छगन भुजबळांनी बीडमध्ये झालेल्या सभेतून बोलताना शरद पवारांना लक्ष्य केलं होतं. यासंदर्भात विचारणा केली असता आपण भुजबळांचं सभेतलं भाषण व्यवस्थित ऐकलंच नाही, असं अजित पवार म्हणाले. “सोशल मीडियावर बघत असताना काही बातम्या मला वाचायला मिळाल्या. माझं मत आहे की राजकीय जीवनात काम करत असताना आपण आपली भूमिका योग्य पद्धतीने मांडायला हवी. ते करत असताना कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत ही काळजी घेतली पाहिजे”, असेही त्यांनी सांगितले.