सरकारला सत्तेची मस्ती, खालच्या पातळीवरचं राजकारण सुरु, अजित पवारांची शिंदे- फडणवीस सरकारवर टीका

अजित पवार सांगली (Sangli News) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तासगाव तालुक्यातील विविध कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली.

    सांगली: राज्यातील सत्ताधाऱ्यांना सत्तेची मस्ती आली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर (Shinde Fadnavis Government) केला आहे. सध्या खालच्या पातळीवरचे राजकारण सुरु असल्याने लोकशाही आणि संविधान धोक्यात आल्याचे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. तासगाव तालुक्यातील आरवडेत ते बोलत होते.(Sangli News)

    अजित पवार सांगली (Sangli News) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तासगाव तालुक्यातील विविध कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली. आरेवाडी ग्रामपंचायतीच्या नूतन ग्राम सचिवालय इमारतीचा लोकार्पण आणि विविध विकासकामांचा शुभारंभ पार पडला. यावेळी राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर.आर.पाटील उपस्थित होते.

    यानंतर झालेल्या सभेत अजित पवार म्हणाले की, “सरकारचं काय चाललंय? आम्ही आर आर अनेक वर्षे सत्तेमध्ये होतो, पण आम्ही कधी चुकीचे वागलो नाही. राज्यातील सरकारला सत्तेची मस्ती आली आहे. पक्षांतर बंदी कायद्याला तिलांजली दिली आहे, कंर्नाटक, मध्य प्रदेशमध्ये सरकार पाडले. हे सर्व 50 खोके सरकार ओके. खालच्या पातळीवरचे राजकारण सुरु आहे, त्यामुळे लोकशाही आणि संविधान धोक्यात आलं आहे.”

    ते पुढे म्हणाले, “राज्याच्या मंत्री मंडळात एकही महिला नाही. विस्तार पण करत नाही. राज्यात अत्यंत गलिच्छ राजकारण सुरू आहे. मंत्रिमंडळ पण वाढवत नाही, सगळ्यांनी मंत्री करतो म्हणून गाजर दाखवले. मात्र, सत्ताधाऱ्यांना आता मंत्रीमंडळ विस्ताराच्या परिणामांची भीती वाटत आहे.

    छत्रपती यांच्याबद्दल बेताल बोलतात. आम्ही कसं खपवून घ्यायचे? शाहू, फुले आणि कर्मवीर यांच्याबद्दलही बोलतात. सरकारचे आमदार, मंत्री देखील बोलत आहेत.त्यांना लाज लज्जा शरम आहे का नाही? छत्रपती संभाजी महाराजांचा स्वराज्यरक्षक संबोधून मी काही चुकीचं बोललो नाही, पण ज्यांनी महापुरुषांच्या अवमान केला त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी विरोधाकांकडून टुकारपणा सुरु असल्याचं अजित पवार म्हणाले.केंद्राच्या साखर निर्यात धोरणावर विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी सडकून टीका केली. आम्ही ओरडून सांगतोय, पण कोणी ऐकत नाही. महाराष्ट्रात प्रचंड साखर शिल्लक असून निर्यातीचा कोटा वाढवला, तर राज्याच्या शेतकऱ्यांना 600 रूपये अधिकचा दर मिळेल.