करूनच दाखवा! नागपुरात येऊन आमचा करेक्ट कार्यक्रम करण्याची हिंमत अजितदादांमध्ये नाही; कोणतेही आव्हान स्वीकारण्यास तयार आहोत-चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुनावले

अजितदादांमध्ये हिंमत आहे आणि ते लढवय्ये आहेत, असा आपला समज होता पण आपल्या बारामतीच्या एकाच दौऱ्याचा त्यांच्यावर इतका परिणाम झाला, त्यांना भिती वाटली आणि ते आपला करेक्ट कार्यक्रम करायला निघाले.

    नागपूर : बारामतीच्या (Baramati) आपल्या एकाच दौऱ्यामुळे (Tour) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजितदादा पवार (NCP And Leader Of Opposition Ajit Pawar) यांना इतकी भिती वाटली की, ते माझा करेक्ट कार्यक्रम (Correct Karyakram) करायला निघाले आहेत. पण आपला करेक्ट कार्यक्रम करण्याची हिंमत अजितदादांमध्ये नाही. त्यांनी नागपुरात (Nagpur) येऊन अशी भाषा करू नये. आपण त्यांचे कोणतेही आव्हान स्वीकारण्यास तयार आहोत, अशा शब्दात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State President Chandrasekhar Bawankule) यांनी बुधवारी सुनावले.

    ते नागपूर येथे विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलत होते. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंगळवारी केलेल्या टिप्पणीला उत्तर देताना ते बोलत होते.

    त्यांनी सांगितले की, अजितदादांमध्ये हिंमत आहे आणि ते लढवय्ये आहेत, असा आपला समज होता पण आपल्या बारामतीच्या एकाच दौऱ्याचा त्यांच्यावर इतका परिणाम झाला, त्यांना भिती वाटली आणि ते आपला करेक्ट कार्यक्रम करायला निघाले. अजून काही दौरे होणार आहेत. आपण त्यांचे कोणत्याही पातळीवरील आव्हान स्वीकारण्यास तयार आहोत.

    ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काँग्रेससोबत युती करूनही ७५ पेक्षा अधिक जागा विधानसभा निवडणुकीत जिंकता आल्या नाहीत, ते काय आमचा करेक्ट कार्यक्रम करणार ? जनता कोणाचा काय कार्यक्रम करायचा ते ठरवत असते. बारामती शहर वगळता संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात अजितदादांच्या वागण्याने प्रचंड नाराजी आहे. हुकुमशाहीसारखे वातावरण आहे.

    प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, आठ आठ दिवस मोबाईल बंद करून भूमिगत होणारे अजितदादा आम्ही पाहिले आहेत. अजितदादांच्या तोंडी करेक्ट कार्यक्रम असे शब्द शोभत नाहीत. त्यांनी विदर्भात येऊन आव्हान देऊ नये.

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुम्ही बरोबरी करू शकत नाही. त्यांच्यावर टीका करण्यापूर्वी आधी स्वतःच्या पक्षाचा विचार करा, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांना सांगितले.