कोणाचंही सरकार असो, राजकीय द्वेषातून कारवाई नको, आत्ता जे घडतं ते…, असं का म्हणाले अजित पवार ?

अजित पवार म्हणाले, “माझं स्पष्ट मत आहे की, केंद्रात आणि राज्यात कोणत्याही पक्षाचं, आघाडीचं किंवा युतीचं सरकार असो राजकीय द्वेषातून कोणत्याही सरकारने कारवाई करू नये. काही आमदार एकनाथ शिंदेंबरोबर गेले आहेत, तर काही आमदार मूळ शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंबरोबर राहिले आहेत.

    औरंगाबाद – ईडीने बुधवारी (११ जानेवारी) सकाळी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर छापे टाकले. कागल आणि पुण्यात काही ठिकाणांवर ही करावाई झाली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया देत या कारवाईचा निषेध केला. आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. “माझं स्पष्ट मत आहे की, केंद्रात आणि राज्यात कोणाचंही सरकार असो, राजकीय द्वेषातून कारवाई करू नये,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.

    अजित पवार म्हणाले, “माझं स्पष्ट मत आहे की, केंद्रात आणि राज्यात कोणत्याही पक्षाचं, आघाडीचं किंवा युतीचं सरकार असो राजकीय द्वेषातून कोणत्याही सरकारने कारवाई करू नये. काही आमदार एकनाथ शिंदेंबरोबर गेले आहेत, तर काही आमदार मूळ शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंबरोबर राहिले आहेत.” “ठाकरे गटाबरोबर असणाऱ्या आमदारांपैकी कोकणातील आमदार राजन साळवी, विदर्भातील आमदार नितीन देशमुख आणि कोकणातीलच सिंधुदुर्गचे आमदार वैभव नाईक या तिघांवर एसीबीच्या चौकशा लावण्यात आल्या,” असा आरोप अजित पवार यांनी केला.

    “केंद्र सरकारच्या आयकर विभाग, ईडी, एनआयए, सीबीआय यांना घटनेने, कायद्याने देशातील कुठल्याही व्यक्तीची चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील सरकारच्या सीआयडी, एसीबी किंवा पोलीस विभाग या सर्व यंत्रणांना चौकशी करण्याचा अधिकार आहे. मात्र, आत्ता जे घडतं आहे त्याला राजकीय रंग आहे अशी शंका काहींच्या मनात उपस्थित होत आहे,” असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.