चैत्यभुमिवरील व्ह्यूईंग डेकवरील अस्वच्छता पाहून भडकले अजित पवार, थेट महापालिका आयुक्तांना केला फोन!

अजित पवार हे बुधवारी सकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमीवर गेले होते. यावेळी त्यांनी चैत्यभूमीला व्ह्यूईंग डेकला भेट दिली. याठिकाणी असणारी अस्वच्छता अजित पवार चांगलेच संतापलेले दिसले.

    मुंबई: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Mahaparinirvan Din) यांचा आज 67 वा  महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवाह यांनी चैत्यभुमीवर उपस्थित राहुन बाबसाहेबांना अभिवादन केलं. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी चैत्यभूमीला लागून असलेल्या समुद्रातील व्ह्यूईंग डेकलाही (Chaitya bhoomi viewing deck) भेट दिली. मात्र, याठिकाणी असणारी अस्वच्छता पाहून अजित पवार चांगलेच संतापले. याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना जाब विचारला. इतकचं नव्हे तर त्यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना फोन करुन तातडीने त्या ठिकाणी बोलावून घेतले.

    अजित पवार यांनी व्ह्यूईंग डेकला दिली  भेट

    अजित पवार यांनी आज चैत्यभुमीवरील व्ह्यूईंग डेकला दिली. यावेळी त्यांना तिथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसली. याबाबत त्यांनी तेथील उपस्थित अधिकांऱ्यांना जाबही विचारला. तसेच त्यांनी  तात्काळ महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना फोन करुन बोलावुन घेतलं.

    व्ह्यूईंग डेकवर साफसफाई ठेवण्याच्या दिल्या सूचना

    अजित पवार यांनी फोन केल्यानंतर इक्बालसिंह चहल काहीवेळातच व्ह्यूईंग डेकवर पोहोचले. तेव्हा अजित पवार यांनी सगळ्यांना बाजूला करत व्ह्यूईंग डेकवरची अस्वच्छता इक्बालसिंह चहल यांच्या निदर्शनास आणून दिली. हे सर्व करताना अजित पवार सातत्याने चहल यांना सूचना देत होते. व्ह्यूईंग डेकवर एका दिशेने बोट दाखवत अजित पवार यांनी चहल यांना त्याठिकाणी सुशोभीकरणासाठी ठेवण्यात आलेल्या झाडांपैकी काही झाडं मेल्याचे सांगितले. ‘या झाडांचं पूर्णपणे नुकसान झालंय आणि आपण काय करतोय?’, असा सवाल अजित पवार यांनी चहल यांना विचारला. ही झाडं आजच बदला, असा आदेश अजितदादांनी चहल यांना दिला. त्यावर इक्बालसिंह चहल यांनी मी तातडीने झाडं बदलून घेतो, असे म्हटले. त्यानंतर अजित पवार यांनी चहल यांना व्ह्यूईंग डेकवर साफसफाई ठेवण्याच्या सूचनाही दिल्या.