पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार भडकले; म्हणाले, ‘नवाब मलिक कोणत्या गटात मला माहिती नाही’

नवाब मलिकांना युतीत सामील करुन न घेण्याची विनंती देवेंद्र फडणवीस यांनी खुलं पत्र जारी करत अजित पवारांना केली आहे. पण या ओपन लेटरवरुन सध्या अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची आजची प्रतिक्रिया सूचक आणि अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

    नागपूर : अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. राष्ट्रवादी नेते नवाब मलिक सभागृहात सत्ताधारी बाकांवर बसले आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. आज सभागृहात नवाब मलिकांवरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपण्याची शक्यता आहे. मलिकांना युतीत सामील करुन न घेण्याची विनंती देवेंद्र फडणवीस यांनी खुलं पत्र जारी करत अजित पवारांना केली आहे. पण या ओपन लेटरवरुन सध्या अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची आजची प्रतिक्रिया सूचक आणि अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. अजित पवारांच्या एकूण बोलण्याचा रोख पाहता आगामी काळात अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांना अंतर दिले जाण्याची शक्यता आहे.

    अजित पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यासंदर्भात लिहेलेल पत्र मला मिळाले, ते मी वाचलं. नवाब मलिक हे काल पहिल्यांदाच सभागृहात आले होते. ते सभागृहात कुठे बसले, याबाबत मीडियाने माहिती दिली. पण आम्ही महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर नवाब मलिक हे पहिल्यांदाच सभागृहात आले होते. त्यांची भूमिका काय आहे, हे ऐकल्यानंतरच मी त्यांच्याबद्दल माझं मत देईन. असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.

    पुढे बोलताना ते म्हणाले, नबाव मलिक यांना न्यायालयाने वैद्यकीय कारणामुळे बाहेर येण्याची संधी दिली आहे. त्यांच्यावरील केस अजून सुरु आहे. सभागृहात कोणी कुठे बसायचे, हा माझा अधिकार नाही. तो निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतात. नवाब मलिक कोणासोबत आहेत, हे अद्याप त्यांनी स्पष्ट केलेले नाही. त्यांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतरच मी बोलेन. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राबाबत काय करायचं ते मी करेन. त्याबाबत मीडियाला सांगण्याचं काही कारण नाही, असे अजित पवार यांनी म्हटले.