‘अजित पवार गटाला शरद पवारांचे नाव व फोटो वापरता येणार नाही’; लेखी लिहून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवार गटाला फटकारले असून शरद पवार यांचे नाव वापरण्यास नकार दिला आहे.

    मुंंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये बंड केल्यानंतर राष्ट्रवादी पक्षामध्ये दोन गट पडले आहेत. अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशी लढत दिसून येत आहे. दरम्यान, अजित पवार गटाकडून अजूनही शरद पवार यांचा फोटो व नाव अनेक ठिकाणी वापरले जात आहे. यावरुन सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवार गटाला फटकारले असून शरद पवार यांचे नाव वापरण्यास नकार दिला आहे. तसेच घड्याळ हे चिन्ह देखील न वारण्याचा सल्ला दिला आहे.

    अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशी लढत सध्या न्यायालयामध्ये चालू आहे. पक्ष चिन्ह व नाव याबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. शरद पवार गटाकडून दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी अजित पवार गटाला धक्का बसला आहे. शरद पवार यांच्या लोकप्रियतेचा वापर अजित पवार करत असल्याचा आरोप शरद पवार गटाने केला. यावर निर्णय देताना सुप्रिम कोर्टाने शरद पवार यांचे नाव आणि फोटो वापरु नका, असे आदेश अजित पवार गटाला दिले आहेत. त्याचबरोबर अजित पवार गटाने घड्याळ चिन्ह वापरू नये असा सल्ला देखील सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

    सर्वोच्च न्यायालयामध्ये पार पडलेल्या सुनावणीवेळी शरद पवार यांच्या नावाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वापर करणार नाही, असे हमीपत्र दाखल करण्यास न्यायालयाने अजित पवार गटाला सांगितले. अजित पवार गटानं शरद पवार यांच्या छायाचित्राचा वापर करु नये. अशा शब्दांत कोर्टानं अजित पवार गटाचे कान टोचले आहेत. तुम्ही त्यांच्या फोटोचा वापर का करता असा प्रश्नही विचारला आहे. तुम्ही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष अशा कोणत्याही प्रकारे शरद पवार यांचा फोटो किंवा चिन्ह वापरु शकत नाही असेही कोर्टानं म्हटले आहे. त्याचबरोबर अजित पवार गटाने निवडणुकीसाठी ‘घड्याळ’ या चिन्हाशिवाय दुसरे चिन्ह वापरावे, जेणेकरून कोणताही गोंधळ होणार नाही, असेही न्यायालयाने तोंडी सुचवले आहे.