ajit-pawar-PC_d

    बारामती : उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार बारामतीत दाखल झाले. बारामतीकरांनीसुद्धा अजित पवारांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी जेसीबीवरून पुष्पवर्षाव करण्यात आला. उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार बारामतीत आले नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्यांच्या आगमनाची उत्सुकता लागली होती. आज शनिवारी (दि २६) त्यांच्या नागरिक सत्कार समारंभाचे आयोजन बारामती शहर राष्ट्रवादी व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले.

    मी सत्तेसाठी हपापलेलो कार्यकर्ता नाही

    अजित पवार यांनी बारामतीमधील सभेत संबोधित करताना, मी जरी वेगळा मार्ग स्विकारला असला, तरीही हा मार्ग विकासाकरिता स्वीकारला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, मी शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन चाललो आहे. मी सत्तेसाठी हपापलेलो कार्यकर्ता नाही. सत्ता येते जाते, मी सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेलो नाही. त्यामुळे मी माझ्या स्वार्थासाठी सत्तेत सहभागी झालेलो नाही. मी विकासाकरिता सत्तेत सहभागी झालो आहे.

    मोदींच्या कामाची स्तुती : मोदींसारखा काम करणारा नेता सध्या देशात दुसरा नाही. आज ते दिवस-रात्र काम करीत असतात. देशभरात विकासाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. आज भारताची अर्थव्यवस्था टॉप 5 मध्ये आहे. जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. विवधतेत एकता ही तुमची माझी ओळख आहे. मोदींना आपल्या देशाची अर्थव्यवस्था टॉप 3 मध्ये न्यायची आहे. मोदींच्या कार्यकाळात विकासाची कामे झाली. बारामतीवरून येणारा पालखी मार्ग केला. बारामतीपासून माळेगावपर्यंत चांगला रस्ता झाला. बारामती-फलटण रोडचे काम झाले. 700 कोटींचे रस्त्याचे कामाला हिरवा कंदील. कुरकुंभवरून बारामतीला येणार रस्ता चांगला केला.