मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने अजित पवारांनी व्यक्त केला संताप

आता मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) लवकर करू, लवकर करू हे सांगणे बंद करा, असा सल्ला शिंदे आणि फडणवीसांना अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिला आहे.

    मुंबई: मंत्रिमंडळ विस्तार आणि पालकमंत्र्यांची नियुक्ती झाली नसल्याने प्रशासन चालवताना अडचणी येत आहेत. माझ्याकडे विरोधीपक्ष नेते म्हणून अकरावीचे विद्यार्थी प्रवेशासंदर्भातील अडचणी सोडवण्याची मागणी करत आहेत. यासाठी आम्ही राज्यपाल, मुख्यमंत्री (CM) आणि उपमुख्यमंत्री (DCM) यांना भेटत आहोत. त्यांच्याकडे अधिवेशन घेण्याची मागणी करण्यात आली आहे. आता मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) लवकर करू, लवकर करू हे सांगणे बंद करा, असा सल्ला शिंदे आणि फडणवीसांना अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिला आहे.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्याच्या दौऱ्यावर असताना काहींना भेटायला दवाखान्यात गेले होते. त्यावेळी तिथं घोषणाबाजी सुरू होती. तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना काही बोलले नाहीत. आता मुख्यमंत्री स्वतःच रात्री दहा नंतरचे स्पीकरचे नियम पाळत नसतील तर अवघड आहे, असंही पवार म्हणाले.

    महाराष्ट्रातील सरकार दिल्लीहून चालत आहे. दिल्लीतील आदेशाशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणताही निर्णय घेता येणार नाही. या दोघांच्या हातात आता काहीच उरलं नाही. दिल्लीवारी केल्याशिवाय राज्य सरकार चालू शकत नसल्याने मुख्यमंत्री सारखे दिल्लीला जात आहेत, असंही ते म्हणाले.