अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी अजित पवार आले धावून; ताफ्यातील गाडी देत केली मदत

बारामतीहून काटेवाडीकडे जात असताना वाटेत झालेला अपघात पाहून क्षणात आपला ताफा थांबवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मदत केली.

    पुणे – सध्या निवडणूकांची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांचे दौरे देखील वाढले आहेत. सभा आणि बैठकांचे सत्र देखील वाढले आहेत. दरम्यान, अजित पवार यांनी आपला ताफा थांबवून अपघातग्रस्तांना मदत केली आहे. बारामतीहून काटेवाडीकडे जात असताना वाटेत झालेला अपघात पाहून क्षणात आपला ताफा थांबवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मदत केली. यामध्ये जखमी झालेले जेष्ठ पत्रकार रामभाऊ तावरे यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. अजित पवार यांना त्यांची ओळख देखील पटली.

    सोनगाव येथील आनंदराव देवकाते पत्नी संगीता यांच्यासह कारमधून बारामतीहून सोनगाव कडे निघाले होते. त्यावेळी रामभाऊ तावरे यांच्या दुचाकीची कारला धडक होऊन तावरे खाली पडले. त्यानंतर काही वेळातच तिथून कन्हेरीकडे जात असताना अजित पवार यांनी आपली गाडी थांबवण्याच्या सूचना दिल्या. हे तर रामभाऊ, असं म्हणत तातडीने स्वत:च्या ताफ्यातील गाडीत तावरे यांना बसवले, सोबत काही लोक दिले आणि दवाखान्यात पाठवले. त्याचबरोबर रुग्णालयातील डॉक्टरांशी फोनवर बोलून सूचना देखील दिल्या. त्यांच्या या कर्तत्वदक्षतेचे कौतुक केले जात आहे.

    या अपघातामध्ये तावरे यांच्या पायाला किरकोळ जखम झाली आहे. अपघात झालेला कळताच क्षणाचा विलंब न लावता अजित पवार यांनी स्वतः केलेली मदत सर्वांना भावली आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचार धडाक्यामध्ये सुरु असताना त्यांनी मदत कार्य केले. तावरे यांना रुग्णालयात पाठवल्यावर त्यांच्या पत्नीला काळजीचे काही कारण नाही, असे सांगून दिलासा देखील दिला.