
पुणे : कारण नसताना मला ट्रोल करायचं काम चालू आहे. काल मी दिवसभर मंत्रालयात होतो. एक लाख पन्नास हजार मुलामुलींची भरती महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागात सुरू आहे. आमच्या विरोधकांना उकळ्या फुटतात आणि काहीही व्हॉट्सअॅप व सोशल मीडियावर वेगळ्या बातम्या पसरवतात, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
शिक्षण विभागात करणार मोठी भरती
मार्केट यार्ड गणेशोत्सव मंडळाच्या कार्यक्रमानंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पवार म्हणाले, मी काल आरोग्य विभागाचा आढावा घेत होतो. अनेक ठिकाणी स्टाफ कमी आहे. तो स्टाफ भरण्याची प्रक्रिया चालू आहे. शिक्षण विभागातही भरती करणार आहोत. ज्या ठिकाणी शिक्षकांची गरज आहे, त्या ठिकाणी निवृत्त झालेल्या शिक्षकांना आपण तात्पुरते घेतले आहे. भरती तत्काळ करावी लागते नाहीतर काही जण लगेच कोर्टात जातात. सध्या विरोधक कारण नसताना आम्हाला बदनाम करण्याचे काम करीत आहेत. आपण वेगवेगळ्या विभागात १ लाख ५० हजार मुला-मुलींची भरती करणार आहोत. ही सगळ्यात मोठी भरती असणार आहे. आतापर्यंत एवढी मोठी भरती कोणत्याही सरकारच्या काळात झाली नव्हती.
निवडणूक आयोगासमोर मांडणार आमची बाजू
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची यावर पवार म्हणाले, निवडणूक आयोगासमोर आम्ही आमची बाजू मांडणार आहोत. ज्यांना बोलावले ते जाणार आहोत. आमची बाजू कशी उजवी हे आम्ही सांगणार आहोत.
संभाजीनगरमधील बैठकीत महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार
आज आणि उद्या मंत्रीमंडळासह अधिकारी वर्ग छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. मीदेखील संभाजीनगरमध्ये जाणार असल्याचे सांगत पवार म्हणाले, संभाजीनगरमध्ये काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. मराठवाड्यातील जे आठ जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांच्या विकासाच्या संदर्भात चर्चा होणार आहे. मराठवाड्यात पावसानं चांगलीच ओढ दिली आहे. अनेक भागात शेतकर्यांची पिकं करपून गेली आहेत. राज्यातही काही भागात अशी स्थिती आहे. ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, तिथं स्थिती चांगली आहे. हवामान विभागाने आणखी चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला असल्याचे त्यांनी सांगितले.