
अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पालकमंत्री पदाची सुत्रे हातात घेतली. चंद्रकांतदादा पाटील गेल्याने भाजप कार्यकर्ते नाराज झाले तर अजितदादा आल्याने राष्ट्रवादी काॅंग्रेसचे कार्यकर्ते खुश झाले आहे.
पुणे : अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पालकमंत्रिपदाची सूत्रे हातात घेतली. चंद्रकांतदादा पाटील गेल्याने भाजप कार्यकर्ते नाराज झाले तर अजितदादा आल्याने राष्ट्रवादी काॅंग्रेसचे कार्यकर्ते खुश झाले आहे. आगामी लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी पालकमंत्री या नात्याने अजितदादांना पार पाडावी लागणार आहे. जिल्ह्याच्या राजकारणात आता दादा विरुद्ध साहेब असे चित्र अधिक रंगणार आहे.
सर्वाेच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भातील सुनावणी नाेव्हेंबर महीन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पुढील वर्षी हाेण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी लाेकसभा निवडणुकीचा बिगूल वाजेल, अशी शक्यता गृहीत धरून सर्वच पक्षांकडून तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने पालकमंत्री बदलले, उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी हाती घेतलेले अजित पवार हे आता पुण्याचे पालकमंत्री झाले आहेत.
गेल्यावर्षी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रिपद साेपविले गेले हाेते. तर तीन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काॅंग्रेसचा अजित पवार समर्थक गट हा राज्य सरकारमध्ये सहभागी झाला. तेव्हापासूनच पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार हेच हाेतील, असे भाकित वर्तविले जात हाेते. ते बुधवारी खरे ठरले.
ताकद काेणाची वाढणार ?
जिल्ह्याच्या विकासकामांसाठी पालकमंत्री हे पद असणे महत्वाचे असते. जिल्हा नियाेजन समितीच्या माध्यमातून हाेणाऱ्या कामांसाठी तरतूद करुन देताना पालकमंत्र्यांची भूमिका महत्वाची ठरते. राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पुणे जिल्ह्यातील बहुतेक आमदार हे अजित पवार समर्थक आहेत. यामुळे या आमदारांना भरीव तरतूद मिळेल यात शंका नाही.