अजित पवार अतिमहत्त्वाच्या कामासाठी मुंबईत येणार, शासकीय विमानानं मुंबईत येणार, अतिमहत्त्वाच्या कामासाठी शासकीय विमानाची परवानगी

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना बुधवारी तातडीच्या कामासाठी मुंबईला जायचे असल्याने राज्य सरकारने त्यांना थेट शासकीय विमान प्रवासासाठी उपलब्ध करून दिले. वर्षभर तुरूंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची आज जामिनावर सुटका होणार असून अजित पवार आणि अनिल देशमुख यांच्यात भेट झाल्यास हा निव्वळ योगायोग ठरणार आहे.

    नागपूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना शासकीय विमान उपलब्ध करून न दिल्यामुळे भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांमध्ये जोरदार जुंपली होती. मात्र, शिंदे-फडणवीस सरकार आणि महाविकास आघाडी यांच्यात वरवर संघर्ष दिसत असला तरी आतून आलबेल आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना बुधवारी तातडीच्या कामासाठी मुंबईला जायचे असल्याने राज्य सरकारने त्यांना थेट शासकीय विमान प्रवासासाठी उपलब्ध करून दिले. वर्षभर तुरूंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची आज जामिनावर सुटका होणार असून अजित पवार आणि अनिल देशमुख यांच्यात भेट झाल्यास हा निव्वळ योगायोग ठरणार आहे. गंमतीचा भाग म्हणजे हा योगायोग जुळवून आणण्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच भूमिका बजावणार आहे.

    सरकारी विमानाचा वापर करावयाचा झाल्यास त्यासाठी आधी सामान्य प्रशासन विभागाकडून परवानगी घ्यावी लागते. सामान्य प्रशासन विभागाने फाइल तयार करून पाठविल्यानंतर त्यावर मुख्यमंत्री स्वाक्षरी करीत विमान प्रवासाची परवानगी देतात. मात्र, ही परवानगी देताना विमानाचा वापर कोणत्या अतीमहत्त्वाच्या वा तातडीच्या कामासाठी होणार आहे हे पाहिले जाते. मंगळवारी अजित पवार यांनी नागपूरहून मुंबईहून येण्यासाठी शासकीय विमानाची परवानगी मागितल्याचे समजते. मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत परवानगी दिल्याचे खात्रीलायकरित्या समजते. दुपारी १ वाजता हे शासकीय विमान अजित पवार यांना घेऊन मुंबईच्या दिशेने उड्डाण करणार असल्याचेही समजते.

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आज जामिनावर सुटतील. त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी तुरुंगाबाहेर जमणार आहेत. आता नेमके अजित पवारही मुंबईला जात असल्याने ते देखील अनिल देशमुखांना भेटणार की, आणखी काय याबाबत अद्याप निश्चित माहिती नाही. मात्र, अजित पवार यांनी अनिल देशमुख यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केल्यास याचे श्रेय शिंदे-फडणवीस सरकारच्या पदरात पडणार आहे.

    राज्यातील सरकार मनमानी करत मागच्या सरकारच्या काळातील निर्णयांना स्थगिती देते; तसेच विधिमंडळ अधिवेशनांमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलण्याची संधी देत नाही, असा आरोप विरोधक करीत आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना तर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहे. मात्र इतर पक्षांकडून तशी भूमिका घेतल्याचे पहायला मिळत नाही. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने विरोधक सरकारच्याविरोधात जोरदार भूमिका घेतील, अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात विरोधकांनी सोयीची भूमिका घेतली. त्यात आता विरोधी पक्षाच्या नेत्यांनाच सरकारने विमान दिल्याने सरकार आणि विरोधक यांच्यात मधूर संबंध असल्याची चर्चा आहे.