अजित पवार यांचे कार्यकर्त्यांना हटके आवाहन; ‘काकाका?’ लिहून करा प्रचार

अजित पवारांनी पक्षाला प्रचारासाठी काही सूचना दिल्या आहेत. प्रचारासाठी काकाका? असे लिहून प्रचार करा असे आवाहन अजित पवार यांनी केले.

    मुंबई – आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. प्रचाराचे शंख फुंकण्यात आले असून महायुती व महाविकास आघाडी (MVA) मधील घटकपक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. यासाठी राज्यभरामध्ये विविध नेत्यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. प्रचारासाठी अनेकांनी भाषण, कार्यक्रम व बैठकांचे आयोजन केले आहे.  अजित पवारांनी (Ajit Pawar) पक्षाला प्रचारासाठी काही सूचना दिल्या आहेत. प्रचारासाठी काकाका? असे लिहून प्रचार करा असे आवाहन अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे.

    अजित पवार यांनी आपल्या राष्ट्रवादी पक्षातील कार्यकर्त्यांना आगामी निवडणूकांसाठी सूचना दिल्या. यावेळी त्यांनी आवाहन केले की, “गेल्या काही वर्षापासून मीडियाचा वेग हा वाढला आहे. आता एखादी बातमी शून्य मिनिटात लोकांपर्यंत पोहोचते. आता इल्क्ट्रोनिक मीडियापेक्षा सोशल मीडियाने जग व्यापलं आहे. त्यामुळे प्रचार करताना काळजी घ्या” असे आवाहन अजित पवार यांनी केले. यावेळी त्यांनी खास सल्ला देखील कार्यकर्त्यांना दिला. “स.का. पाटलांचा प्रचार करताना पापापा ( पापापा म्हणजे पाटलाला पाडलं पाहिजे, ही घोषणा जॉर्ज फर्नांडिस यांनी दिली होती. तेव्हा सोशल मीडियाही नव्हता ) असं लिहून प्रचार केला जात होता. आता काकाका ( काका का? ) असं लिहून प्रचार केला पाहिजे,” असे आवाहन अजित पवार यांनी करताच कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला.

    आता सीसीटीव्ही आहेत, जपून रहा

    अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना समजावताना सांगितले, “भाजपने सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला आहे. 2014ला सोशल मीडियाचा प्रभाव पाहिला. सोशल मीडिया ही दुधारी तलवार आहे, एखाद्या समाजाची आणि एका व्यक्तीचं मन दुखावलं गेलं तर त्याचं पक्षाला उत्तर द्यावं लागतं. तुम्ही फार काळजीनं वागा. सगळीकडे आता सीसीटीव्ही लागलेले असतात. तुम्ही पण जपून रहा,” असा सावधानी बाळगायचा इशारा अजित पवार यांनी आपल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.