बारामती तालुक्यातील ३१ पैकी २९ ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाचे वर्वस्व

अत्यंत चुरशीच्या झालेल्या बारामती तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतीच्या निवडणुक निकालामध्ये २९ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने बाजी मारली. तर २ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने वर्चस्व मिळविले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध भाजप अशी लढत झाली.

    बारामती: अत्यंत चुरशीच्या झालेल्या बारामती तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतीच्या निवडणुक निकालामध्ये २९ ग्रामपंचायतीवर  राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने बाजी मारली. तर २ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने वर्चस्व मिळविले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध भाजप अशी लढत झाली, या लक्षवेधी लढतीत अजित पवार गटाने १६ पैकी १४ जागा जिंकत आपले वर्चस्व अबाधित राखत भाजपचा दारुण पराभव केला. या निवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवार मंदाकिनी दादा भिसे यांच्यासह १४ उमेदवार अजित पवार गटाचे विजयी झाले. भाजप पुरस्कृत पॅनलचे दोन उमेदवार विजयी झाले. चांदगुडेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपचे नेते दिलीप खैरे यांच्या नेतृत्वाखालील भाजप पुरस्कृत पॅनलचे अशोक गजानन खैरे हे विजयी झाले. त्यांच्या विरोधात असलेले राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलचे कल्याण हिम्मत राजपुरे हे ७० मतांनी पराभूत झाले. पारवडी ग्रामपंचायत च्या निवडणुकीमध्ये भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने निर्विवाद वर्चस्व राखत राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलचा पराभव केला. मात्र पारवडी मध्ये चार जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेसने आपले खाते उघडले.

    बारामती तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या व लक्षवेधी ठरल्या. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी गावातील निवडणूक देखील लक्षवेधी ठरली. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी नेहमीप्रमाणे उमेदवारांच्या मुलाखती घेऊन उमेदवार निवडले होते. काटेवाडीत अजित पवार गट पुरकृत जय भवानीमाता पॅनेल विरूद्ध भाजप पुरस्कृत बहुजन ग्रामविकास पॅनल अशी लढत झाली, या लढतीत भाजपचेफक्त दोन उमेदवार विजयी झाले, तर उर्वरित १४ उमेदवार अजित पवार गटाचे विजय झाले. गुणवडी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सत्ताधारी गटाचे सतपाल गावडे, माजी सभापती संदीप बांदल, छत्रपती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विश्वनाथ गावडे आदींच्या नेतृत्वाखालील पॅनलचा भारत पाटील गावडे, वैजनाथ गावडे, राजेंद्र गावडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने पराभव करून सत्ता हस्तगत केली. कऱ्हावागज ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंच पदाचे उमेदवार नितीन मुलमुले यांच्यासह त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनल ने निर्विवाद वर्चस्व राखत संतोष नाळे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा पराभव केला. सुपे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विद्यमान सरपंच स्वाती हिरवे यांचे पती अनिल हिरवे यांचा सरपंच पदाच्या निवडणुकीत माजी जिल्हा परिषद सदस्य बी. के हिरवे यांच्या पॅनलचे उमेदवार तुषार अर्जुन हिरवे यांनी वीस मतांनी पराभव केला, तसेच सरपंच पदाचे तिसरे उमेदवार मनोज खैरे हे देखील फक्त वीस मतांनी पराभूत झाले. सुपे ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये शौकत कोतवाल यांचा देखील पराभव झाला. दरम्यान बारामती तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतचे निकाल प्रशासकीय भवन मध्ये जाहीर झाल्यानंतर उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.