अजित पवार यांचा लोकसभेचा अर्ज नामंजूर, शरद राम पवार यांचा अर्ज मंजूर

अर्ज छाननीत अजित पवार यांचा अर्ज बाद झाला आहे. तर सुनेत्रा पवार यांचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे.

  बारामती – देशभरामध्ये सध्या लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. निवडणूकीचा पहिला टप्पा पार पडला असून इतर मतदारसंघातील प्रचाराच्या तोफ चालू आहेत. राज्यामध्ये देखील महाविकास आघाडीसह महायुती जोरदार प्रचार करत आहे. राज्यामध्ये सर्वांत जास्त लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागले आहे बारामतीमध्ये पवार कुटुंबातील दोन्ही उमेदवार असल्यामुळे लढत रंगात आली आहे. शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे तर अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या उमेदवारांकडून अर्ज देखील दाखल करण्यात आले आहे. मात्र अजित पवार यांचा अर्ज बाद करण्यात आला आहे.

  अजित पवार यांचा अर्ज बाद

  महायुतीकडून सुनेत्रा पवार यांनी अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर अजित पवार यांनी देखील सुरक्षेच्या दृष्टीने अर्ज दाखल केला होता. अर्ज छाननी प्रक्रियेमध्ये सुनेत्रा पवार यांचा अर्ज रद्द झाला तर दावा रहावा म्हणून अजित पवार यांनी देखील अर्ज दाखल केला होता. मात्र अर्ज छाननीत अजित पवार यांचाच अर्ज बाद झाला आहे. याउलट सुनेत्रा पवार यांचा अर्ज मंजूर झाला आहे. अजित पवार यांनी डमी उमेदवारी अर्ज भरला होता. अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर पक्षाकडून उमेदवार असावा म्हणून डमी अर्ज भरण्याची परंपरा आहे. मात्र, अर्ज छाननीत अजित पवार यांचा अर्ज बाद झाला आहे. तर सुनेत्रा पवार यांचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे.

  सुप्रिया सुळे यांचा अर्ज मंजूर

  त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांचा अर्ज देखील मंजूर झाला आहे. तर शरद पवार गटाकडून डमी अर्ज भरलेल्या सचिन दोडकेचा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे. दोडके यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. निवडणूक आयोगाने आज अर्ज छाननीसाठी अनेकांना बोलावलं होतं. एकाच पक्षाचे दोन अर्ज असल्यामुळे एकाच उमेदवाराचा अर्ज मंजूर करण्यात आला. तर डमी उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आला आहे. सुनेत्रा पवार यांच्यापाठोपाठ सुप्रिया सुळे यांचा अर्ज वैध ठरल्याने आता दोन्ही नणंद-भावजयांमध्ये बारामतीमध्ये लढत होणार आहे.

  शरद राम पवार बारामतीच्या रिंगणात

  ‘बघतोय रिक्षावाला’ संघटना पुरस्कृत उभे असलेले अपक्ष उमेदवार, रिक्षाचालक शरद राम पवार यांचा बारामती लोकसभेसाठीचा अर्ज मंजूर झाला आहे. सर्व बाबींची पूर्तता केल्यामुळे हा अर्ज वैध झाला असून प्रशासनाकडून मान्य करण्यात आला आहे. त्यामुळे बारामतीत पवार घराण्यात निवडणूक होत असतानाच शरद पवार नावाचा व्यक्ती मैदानात उतरल्याने या निवडणुकीची रंगत आणखी वाढली आहे. बारामतीच्या लोकसभा निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या 7 मे रोजी बारामतीचे मतदान पार पडणार आहे.