‘माझ्या लेकानं डोळ्यादेखत CM व्हावं’; अजित पवारांच्या मातोश्रींनी व्यक्त केली इच्छा

अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान करून आल्यानंतर मातोश्रींनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा व्यक्त केली आहे.

    बारामती : राज्यात २३५३ ग्रामपंचायतींमधील २० हजारपेक्षा अधिक जागा तसेच तीन हजार पोटनिवडणुका अशा एकूण सुमारे २५ हजार जागांसाठी आज मतदान होत आहे. मतदानाला राज्यभर सुरुवात झाली असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान करून आल्यानंतर मातोश्रींनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा व्यक्त केली आहे.
    “अजित पवार आजारी असल्यामुळे मतदानासाठी येऊ शकले नाहीत. अशक्तपणा आला आहे. 1957 सालापासून मी मतदान करत आहे. काटेवाडीतील लोकांचा मतदानासाठी प्रतिसाद छान आहे. सुरुवातीचं पहिलं मत मी दिलं आहे. अजित पवारांवर लोकांचं प्रेम आहे. पण पुढचं काय सांगता येतं? सर्वांना वाटतं की दादांनीच मुख्यमंत्री व्हावं. माझं वय 86 आहे. त्यामुळे माझ्यादेखतच मुलाने मुख्यमंत्री व्हावं ही इच्छा आहे. कुणास ठाऊक इच्छा पूर्ण होईल की नाही. लोक पण अजित पवार यांच्यावर प्रेम करतात. आता पाहुयात,” असे आशा पवार म्हणाल्या.
    दरम्यान, राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून अजित पवार गटाकडून सातत्याने ते मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. अजित पवार महायुतीत गेल्यापासून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा दावा सातत्याने केला जात आहे. अजित पवार लवकरच मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा त्यांच्या समर्थकांनीही व्यक्त केली होती. तसेच अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं असेल तर त्यांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री करू. वेळ येईल तेव्हा त्यांना मुख्यमंत्री करू, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. तसेच अजित पवार मुख्यमंत्री झाले तर त्यांचं अभिनंदन करायला पहिला हार घेऊन मी जाईन, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली होती. त्यामुळे अजित पवार यांच्या मातोश्रींची इच्छा कधी पूर्ण होणार याकडे सगळ्यांचेचं लक्ष्य लागलं आहे.