अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी त्यांच्या आईची इच्छा ; सुप्रिया सुळेंची एका वाक्यात प्रतिक्रिया

राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात २३५३ ग्रामपंचायतींमधील २० हजारांपेक्षा अधिक जागांसाठी आज मतदान सुरु आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

    राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात २३५३ ग्रामपंचायतींमधील २० हजारांपेक्षा अधिक जागांसाठी आज मतदान सुरु आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर अजित पवारांच्या मातोश्रींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा व्यक्त केली.

    माझं वय आता ८६ वर्षे आहे, त्यामुळे माझ्या डोळ्यादेखत (हयातीत) माझ्या मुलाने (अजित पवार) मुख्यमंत्री व्हावं. बारामती आपलीच आहे, लोकांचंही दादांवर प्रेम आहे, अशी प्रतिक्रिया आशाताई पवार यांनी दिली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

    “अर्थातच कुठल्या आईला असं व्हावं वाटणार नाही.” सुप्रिया सुळेंनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. दुसरीकडे, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. “अजितदादांच्या स्वप्नांसाठी त्यांच्या आईने प्रार्थना केली असेल तर ती स्वाभाविक आहे. आई म्हणून त्यांची प्रार्थना अजित पवारांच्या स्वप्नांना भरारी देणारी ठरो. अजित पवारांचं मनपरिवर्तन आणि मतपरिवर्तन झालं तर त्यांचं स्वप्न नक्की पूर्ण होऊ शकेल,” असं वडेट्टीवार म्हणाले.