
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी अचानक आज बारामती शहरातील राष्ट्रवादी शहर कार्यालयाला भेट दिली, यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी आम्हाला तुमची गरज आहे, त्यामुळे तुम्ही राजकारणात या, असा आग्रह केल्यानंतर, तुम्ही अजित दादांशी बोला, त्यांनी ग्रीन सिग्नल दिला की मी आहेच!, असे सांगत राजकारणात येण्याचे अप्रत्यक्ष संकेत जय पवार यांनी यावेळी दिले.
बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी अचानक आज बारामती शहरातील राष्ट्रवादी शहर कार्यालयाला भेट दिली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी आम्हाला तुमची गरज आहे, त्यामुळे तुम्ही राजकारणात या, असा आग्रह केल्यानंतर, तुम्ही अजित दादांशी बोला, त्यांनी ‘ग्रीन सिग्नल’ दिला की, मी आहेच! , असे सांगत राजकारणात येण्याचे अप्रत्यक्ष संकेत जय पवार यांनी यावेळी दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीमध्ये जल्लोषात स्वागत झाल्यानंतर, कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी जय पवार यांनी आज (दि २८) बारामती शहरातील शारदा प्रांगण या ठिकाणी असलेल्या राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयाला भेट दिली. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील यांच्यासह राष्ट्रवादी शहर चे युवक अध्यक्ष अविनाश बांदल, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत वाबळे, शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष विशाल जाधव यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. उपस्थित कार्यकर्त्यांनी जय पवार यांना मुख्यमंत्री अजितदादा होणार आहेत, असा विश्वास व्यक्त करत, तुम्ही आमच्या युवकांचे नेतृत्व करावे, आम्ही तुमच्या कायम बरोबर आहे, तुम्ही पंधरा दिवसातून एकदा बारामती शहरात यावे, आम्ही कायम तुम्हाला साथ देऊ, असा आग्रह केला.
यावेळी जय पवार म्हणाले, “अजित दादांचा नागरी सत्कार समारंभ व मिरवणूक मोठ्या उत्साहात व हजारो नागरिकांच्या उपस्थितीत झाली, मी त्या दिवशी आलो नव्हतो, मात्र मी फोटो पाहिले, पार्थ दादा आले होते. तुम्ही अजितदादांना बोला, त्यांनी ग्रीन सिग्नल दिला, की मग मी आहेच!”, असे आश्वासन देत त्यांनी राजकारणात येण्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले.