बारामतीकरांचे प्रेम मला काम करण्यास बारा हत्तीचे बळ देते; तर पुणे-नगर-नाशिक रेल्वेचा प्रश्न लावणार मार्गी : अजित पवार

    बारामती : अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच बारामतीत आले. यावेळी बारामतीकरांनी मोठ्या जल्लोषात अजितदादांचे स्वागत केले. आपले जंगी स्वागत झाल्याचे पाहून अजित पवारसुद्धा भारावून गेले. त्यांनी बारामतीमधील सभेतसुद्धा बारामतीकरांच्या प्रेमाचे, स्वागताचे भरभरून कौतुक करताना, असे स्वागत होईल असे स्वप्नातसुद्धा पाहिले नसल्याचे कबुल केले. एवढे तुम्हा लोकांचे प्रेमच मला काम करण्यासाठी बारा हत्तीचे बळ देते.

    पुणे-नगर-नाशिक रेल्वे मार्ग अनेक वर्षांपासून रखडलेला

    पुणे-नगर-नाशिक रेल्वे मार्ग हा गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे, हा रेल्वे मार्गाचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार या कामाला वेग देणार असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर गरज पडल्यास दिल्लीला जाणार असल्याचंही ते म्हणाले. बारामतीत जाहीर सभेत बोलताना त्यांनी हे मोठं आश्वासन दिलं आहे.

    अजित पवार म्हणाले, तुम्ही पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर काय करणार? असं मला लोक विचारतात. तर मी त्यांना सांगू इच्छितो. मी पुणे-नगर-नाशिक हा रेल्वेमार्ग थोडासा रेंगाळलेला आहे, त्या कामाला गती देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. गरज पडल्यास दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह किंवा रेल्वे मंत्र्यांना भेटेन. त्यांच्याकडं पाठपुराव्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.

    त्याचबरोबर दळणवळणचा प्रश्न महत्वाचा आहे. त्यामुळं पुण्यासाठी विमानतळ, मेट्रो, रस्ते, चांगल्या प्रकारच्या सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार कारण हे केल्याशिवाय शहराचा आणि जिल्ह्याचा कायपालट होणार नाही.