सलग सुट्ट्यांमुळे अक्कलकोट गजबजले; देश विदेशातील भाविकांची गर्दी

दत्तजयंती उत्सव व नाताळ सुट्टीमुळे श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी गर्दी वाढत असून, यंदा मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

  अक्कलकोट : दत्तजयंती उत्सव व नाताळ सुट्टीमुळे श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी गर्दी वाढत असून, यंदा मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांना सुलभ सुविधा मिळण्याकामी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, प्रांताधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी लक्ष घालण्याची मागणी सकल स्वामी भक्तातून होत आहे.
  मंदिर परिसरातील मोठ्या प्रमाणातील अतिक्रमण अरुंद रस्ते, रस्त्यावरील भाविकांची वाहने पार्किंग, भर रस्त्यावर थांबणाऱ्या रिक्षा, सतत वाढत चाललेल्या गर्दीने वारंवार वाहतुकीची कोंडी मंदिर परिसरात होत आहे. दर्शनरांग मंदिराच्या बाहेर वाहतुकीच्या रस्त्यावर येत आहे. दर्शन रांगेतील भाविकांच्या सुरक्षेकरिता मंदिर परिसरात काही अंतरावरच चार चाकी वाहने, रिक्षा हंगामी यात्रा काळात प्रवेश बंद करणे गरजेचे आहे.
  मंदिर परिसरातील दुर्गंधी, अस्वच्छता यामुळे भाविकांना अनेक अडचणीच्या सामोरे जावे लागते. यामुळे स्वच्छता राखणे, धुर फवारणी फवारणी आवश्यक आहे. जागोजागी भाविकाना पिण्याचे पाणी, हात पायधुण्यासाठी पाणी याची सोय करणे गरजेचे आहे. अग्निशमन आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवणे, आप्तकालीन यंत्रणा सज्ज ठेवणे, यंत्रणेची तपासणी करणे आवश्यक आहे. गाणगापुर यात्रा, नाताळ सुटी, नविन वर्षाचे स्वागत यामुळे अक्कलकोटमध्ये पुणे, मुंबईसह देश-विदेशातून भाविकांची संख्या वाढणार असून सुट्टीत प्रचंड गर्दी होणार आहे.
  या ठिकाणी वाढणार गर्दी
  गत दिवाळीच्या सुट्टीमध्ये पहाटे तर दर्शनाची रांग राजे फत्तेसिंह चौकापर्यंत गेली होती. भाविकांना दर्शनासाठी आठ ते दहा तास लागले हाेते. सुट्ट्यांच्या दिवशी वटवृक्ष देवस्थान, मुरलीधर मंदिर, समाधी मठ (चोळप्पा मठ), गुरु मंदिर (बाळप्पा मठ), राजेराय मठ, शिवपुरी, नवसाचा मारुती मंदिर, एकमुखी दत्त मंदिर व अन्नछत्र मंडळ व परिसरातील श्री शमी विघ्नेश गणेश मंदिर येथे दर्शनासाठी व महाप्रसादाकरिता गर्दी होणार आहे.
  पाक्रिंगसाठी जागा पडतेय अपुरी
  दिवाळीच्या सुट्टीमध्ये पोलिस प्रशासनाने मंदिर परिसरातील वाहनांची कोंडी टाळावी म्हणून कमलाराजे चौक, कारंजा चौक, मैंदर्गी रोड, बासलेगाव रोडवर पार्किगची सोय केली. ही सोय अपुरी पडत असून नव्याने वाहने पार्किगसाठी जागा निश्चित करणे, गरजेप्रमाणे पर्यायी राखीव जागा निश्चित करणे, पार्किंग सोय करणे आवश्यक आहे
  आराखड्याची अंमलबजावणी कधी ?
  समाधी मठाजवळ दाटीवाटीने भक्तांना मंदिरापर्यंत पोहोचावे लागते. याबाबत प्रशासनाने सुटसुटीतपणा आणण्याकामी विशेष योजना आखणे गरजेचे आहे. यामध्ये काही रस्ते वनवे करणे आवश्यक आहे. तेथील रहिवाशांनी देखील होणाऱ्या गर्दीमुळे प्रशासनास सहकार्य करणे आवश्यक आहे. शहराची सुधारित शहर विकास आराखड्याची अंमलबजावणी कधी होणार ? असा प्रश्न स्वामी भक्तातून होत आहे.